नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील खरड गावाच्या हद्दीतील डोंगरावर मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण वणव्याने थैमान घातले. यामुळे श्री मलंगगड परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली. सकाळच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत डोंगर उतारावर पसरलेल्या गवताळ भागासह झुडपे व लहान वृक्ष जळून खाक केली आहेत. आगीचे लोळ आणि दाट धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. डोंगरावर वणवा लागल्याची माहिती बदलापूर वनविभागाच्या वनरक्षकांना मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
श्री मलंगगड परिसर हा निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध मानला जातो. या भागात नेहमीच विविध वन्यप्राणी, पक्षी तसेच दुर्मिळ वनस्पती आढळतात. मात्र सातत्याने होणाऱ्या वणव्यांमुळे येथील वनसंपदेवर गंभीर संकट ओढावले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनस्पती जळाल्याने नैसर्गिक अधिवासाचे नुकसान झाले असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत या परिसरात तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अशा प्रकारे वणवे सुरू राहिल्यास बिबट्यांसह अन्य वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
दरम्यान या आगीची माहिती मिळताच बदलापूर वनविभागाच्या वनरक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आणि अथक प्रयत्नांनंतर दुपारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात वनविभागाला यश आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी वनसंपदेचे नुकसान झाले आहे. वणव्यांचे वाढते प्रकार पाहता येथे नियमित गस्त, जनजागृती आणि दोषींवर कठोर कारवाईची गरज असल्याची मागणी पर्यावरणप्रेमी, नागरिकांकडून होत आहे.