Thane Shiv Sena UBT protest pudhari photo
ठाणे

Thane Shiv Sena UBT protest : पालिका वृक्ष प्राधिकरणाविरोधात शिवसेना उबाठाचा एल्गार

भ्रष्ट कारभार सुधारा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा दिला इशारा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कथित ढिसाळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी अनोख्या पद्धतीने जोरदार आंदोलन छेडले. माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर संघटक महेश कदम यांनी चंदनवाडी येथील शिवसेना शाखेपासून ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत अंगावर झाडांच्या फांद्या लपेटून पायी दिंडी काढली.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. तर, महानगर संघटक महेश कदम यांनी, महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. एकीकडे झाडे कोसळून ठाणेकरांचा जीव जात आहे. तरी वृक्षप्राधिकरण सुस्त आहे. पैशांच्या मलिद्यासाठी वेळेवर फांद्या छाटणीचे काम होत नाही. तेव्हा, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. करदात्यांच्या पैशावर जगणाऱ्या अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

ठाणे महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभाग हा सर्वाधिक भ्रष्ट विभाग असून, गेल्या सात दिवसांत शेकडो झाडे कोसळली आहेत. मागील ७२ तासांतच झाडे आणि फांद्या पडून सुमारे ५० वाहनांचे नुकसान झाले. काही वर्षांपूर्वी महापालिकेजवळच एका वकिलाचा झाड कोसळून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या पत्नीला अद्याप कायमस्वरूपी नोकरी देण्यात आलेली नाही. याकडे लक्ष वेधून महेश कदम यांनी, याप्रकरणी स्थानिक आमदारांना आजही विधिमंडळात आवाज उठवावा लागत असल्याची खंत व्यक्त केली.

पुढे बोलताना त्यांनी, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महापालिका आयुक्तांना ठाणेकरांच्या प्रश्नांपेक्षा नगरविकास मंत्र्यांसोबत चॅटिंग करण्यात अधिक रस असल्याचा गंभीर आरोप केला. आंदोलनानंतरही प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा महेश कदम यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही ठाणे महापालिकेच्या कथित भ्रष्ट कारभारावर सडकून टीका करत वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT