मोठा भाऊ कोण यावरून संघर्ष  pudhari photo
ठाणे

Shiv Sena vs BJP dispute : मोठा भाऊ कोण यावरून संघर्ष

ठाण्यातही महापालिकेत महायुती होण्याची चिन्हे धूसर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : माजी नगरसेवकांच्या पळवापळवीवरून शिवसेना-भाजप यांच्यातील वाद दिल्लीपर्यंत पोहचला आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतराला ब्रेक लावण्याचा निर्णय झाला. मात्र वादाची ही ठिणगी अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अधिक तीव्र होताना पाहायला मिळेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते ठाणे जिल्ह्यातील असल्याने आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा या शिवसेना - भाजपमधील संघर्षाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती सत्तेवर आणण्यास ठाणे जिल्ह्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करून मित्र पक्ष भाजपाला तगडा धक्का दिला. मात्र अडीच वर्षातच भाजपने ऑपरेशन लोटस राबवून वचपा काढला. त्यासाठी ठाण्याचे शिलेदार एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि पुन्हा एकदा भाजप - शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले.

शिंदे यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याला लाभला. अडीच वर्षानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. या दोन्ही घटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे डोंबिवलीचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. चव्हाण यांनी सलग दोन वेळा भाजपचे नऊ - नऊ आमदार ठाण्यातून निवडून आणले आहेत.

पालघर जिल्ह्यासह कोकणात भाजप वाढविली. तरीही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नसल्याने बरीच उलटसुलट चर्चा रंगली आणि अखेर चव्हाण हे भाजप प्रदेश अध्यक्ष बनले. त्यानंतर चव्हाण यांनी राज्यभर पक्ष वाढीसोबत शिवसेनेला शह देण्यास सुरुवात केली. त्यातून स्थानिक पातळीवर चव्हाण यांच्याविरोधातील शिवसेनेचे काही स्थानिक नेत्यांनी मोहीम आखली. त्या नेत्यांच्या पाठीशी कुणाचे पाठबळ होते, हे ज्ञात झाल्याने कल्याण - डोंबिवलीमधील युतीच्या कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते.

अशा संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आणि पक्ष वाढीची मोहीम अधिक तीव्र होऊ लागली. वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात भाजपचा महापौर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेत त्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यातून भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष वाढू लागला.

शिवसेनेने राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडताना उल्हासनगरमधील भाजपचे नगरसेवक फोडल्याने नव्या वादाला सुरुवात झाली. अखेर डोंबिवलीतील शिवसेनेचे चार नगरसेवक फोडून भाजपने बदला घेतला आणि वाद अधिक भडकला. त्यापूर्वी ज्या स्थानिक नेत्याच्या माध्यमातून शिवसेना रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मोहीमी राबवण्यात आली होती, त्या दीपेश म्हात्रे यांच्या हाती कमळ देऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शिवसेना नेत्यांना शह दिल्याचे बोलले जाते.

वाद दिल्लीश्वरांपर्यंत नेण्यात आल्याची चर्चा

यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीमध्ये लढवायच्या नाहीत, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेली आहे. जर युती करायची असेल तर सत्तेमधील वाटा समसमान असावा, अशी मागणी भाजपकडून होऊ लागल्याने अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत युती तुटून स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या जात आहेत.

भाजपला अडीच वर्ष नगराध्यक्षपद देण्यास शिवसेनेने नकार दिला असून दीड वर्ष नगराध्यक्षपदाचा प्रस्ताव भाजपने अमान्य केले आहे. सत्ता वाटपाचे हेच वारे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत वाहणार असल्याने हा वाद दिल्लीश्वरांपर्यंत नेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT