ठाणे

Dombivli Shiv Mandir Crematorium Upgrade -शिवमंदिर स्मशानभूमीला मिळणार नवा लूक

शिवमंदिर स्मशानभूमीला मिळणार नवा लूक आधुनिक पध्दतीची नवीन स्मशानभूमी; ३०० दिवसांत सुशोभीकरण

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बजरंग वाळुंज

डोंबिवलीच्या पूर्वेतील दत्तनगर परिसरात असलेली जुनी स्मशानभूमी ही ग्रामपंचायत आणि नगरपालिका काळातील आहे. या स्मशानभूमीत डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण भागातून पार्थिव दहनासाठी आणले जातात. गेल्या सहा-सात वर्षांच्या कालावधीत स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पार्थिवांचे मंचकावर दहन होत असताना पावसाचे पाणी त्यावर पाडण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे आता ही स्मशानभूमी तोडून त्याठिकाणी आधुनिक पध्द्तीच्या नवीन स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने डोंबिवलीच्या दत्तनगर येथील शिवमंदिर परिसरातील जुन्या स्मशानभूमीचा कायापालट येत्या ३०० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे डोंबिवलीकर प्रचंड त्रस्त झाले होते. पावसाळ्यात संपूर्ण परिसरात चिखल आणि पाणी साचत असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना बसण्यासाठी व्यवस्था नीटनेटकी नसल्याने तासनतास उन्हा/पावसात थांबावे लागत असे. शेड असूनही नसल्यासारखी असल्याने कधी कधी तर अंत्यसंस्कार अर्ध्यातच थांबवण्याची वेळ अनेकदा आली होती. पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह आणि लाईटची योग्य व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी येणे म्हणजे मोठीच कसरत होती. या सर्व समस्यांबाबत स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे निवेदन देऊन स्मशानभूमीच्या पुनर्बाधणीची मागणी केली होती.

अखेर नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले आहे. याबतचा कायदिश कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केला आहे. कार्यदिशांनुसार या कामाची जबाबदारी मे. केम सर्व्हसेस या ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे. या योजनेनुसार आधीची जुनी आणि मोडकळीस आलेली स्मशानभूमी पूर्णपणे तोडून त्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त अशी नवीन स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येत आहे. नवीन स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी बसण्याची सोय म्हणून प्रशस्त प्रेक्षक गॅलरी बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर पावसापासून संरक्षणासाठी मोठा शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. जेणेकरून नातेवाईकांना सन्मानाने आपल्या प्रिय व्यक्तीला शेवटचा निरोप देता येईल.

महानगरपालिकेने या कामासाठी ३०० दिवसांची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे हे सर्व काम ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. डोंबिवलीच्या पूर्व भागातील ही एकमेव मोठी स्मशानभूमी असल्याने हजारो नागरिक या स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT