Shinde drove Fadnavis' car, but Pawar focused on the steering.
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्र्यांसमवेतच्या तीन बैठकांना बुधवारी दांडी मारणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे स्टेअरिंगच हाती घेतले. त्यावेळी मागे बसलेल्या अजित पवार यांनी स्टेअरिंग कसे चालवतात हे मी पाहतोय, असे सांगत या घडामोडीत नवे ट्विस्ट आणले.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले. ऑडी गाडीचे स्टेअरिंग सुरुवातीला शिंदेंकडे तर नंतर फडणवीस यांच्याकडे होते. हे गाडी कशी चालवतात हे मी पाहात होतो, असे सांगत अजित पवारांनीही यात आपली भूमिका सांगितली. सध्या फडणवीस सरकारच्या ११० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जवळपास २३७ आमदार त्यांच्या सोबत आहेत. आता आपले सरकार सुखेनैव सुरू आहे, असे सांगण्यासाठी सरकारचे तीन प्रमुख एकाच गाडीत एकाचवेळी आले आणि वेगवान समृद्धीवर प्रवासकर्ते झाले.
समृद्धी महामार्ग तर आम्ही पूर्ण केलाच, आता शक्तिपीठही पूर्ण करू, असे सांगण्यास फडणवीस विसरले नाहीत. समृद्धीचे यश हे माझं आहे, असे दाखवत या तिन्ही नेत्यांनी आमच्या सरकारने आपल्या भूमिकाही स्पष्ट केल्या. आता अनुशेष असलेल्या विदर्भाला नवा महामार्ग मिळाल्याने आता नवी समृद्धी येईल, अशीही भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
शिंदेंची नाराजी या समृद्धीच्या घडामोडीनंतर दूर होणार, असे सांगितले जात असून आता राज्य सरकारमध्येही राष्ट्रवादीचे एकीकरण आणि जयंत पाटलांचा मंत्रिमंडळात प्रवेश याही चर्चा सुरू झाल्याने शिंदे नाराज होते, असे सांगितले जात होते. आता या महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सरकारमध्येही समृद्धी आणि शिंदेंच्या नाराजीनाट्याला पूर्णविराम, असा नवा ट्विस्ट या निमित्ताने पाहायला मिळत आहे.