Bhiwandi crime Newsp pudhari
ठाणे

Bhiwandi crime News: भावानेच दिली सख्ख्या भावाच्या हत्येची सुपारी

गणेशपुरी हत्येचा आरोपी पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश; चार आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथे कामावर निघालेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 12 मे रोजी उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. गणेशपुरी पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी अथक प्रयत्नातून या हत्येच्या गुन्ह्यातील चार आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले असून यामध्ये हत्येची सुपारी देणाऱ्या सख्ख्या भावाचा सुद्धा समावेश आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी तालुक्यातील शेडगाव या गावातील परेश टोलाराम पाटील वय 40 वर्ष हा पाऊणे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकी वरून वसई येथे कामावर जात असताना वाशिंद-अंबाडी रोड शेडगाव फाटा या दरम्यान गावतलावा जवळ कोणी तरी अज्ञात व्यक्तीने हत्याराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून हत्या केली होती.

याबाबत त्याचा भाऊ नरेश पाटील वय 37 याने गणेशपुरी पोलिस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. या हत्येने परिसर हादरून गेला असताना ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल झाल्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामी मार्गदर्शन केले.

गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वा खाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड, शरद सुरळकर, उमेश खिरड, मयुर शेवाळे, निरंजन पाटील यांची पथके तयार करून तपास सुरू केला.

या पोलिस पथकाने अथक परीश्रम घेऊन 200 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे पाहणी केली तसेच, तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यात आरोपीतांनी गुन्हा करण्या करीता वापरलेले वाहनाचा क्रमांक प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी राकेश भगवान पाटील वय 37, प्रेमजीत मधुकर घरत वय 38, दक्षत भानुकांत भोईर वय 24 रा. विलंगी पो.आगरवाडी केळवा जि.पालघर यांना ताब्यात, घेऊन त्यांच्या कडे गुन्ह्याच्या कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी हत्येची कबुली दिली.

गुन्ह्यात फिर्यादी असलेला मयत परेश याचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील याने मारण्याची सुपारी देऊन भावास जीवे ठार मारण्याचा कट रचला असल्याचे कबुल केल्याने या गुन्ह्यात चार ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जमिनीच्या वादातून दिली हत्येची सुपारी

मयत परेश व आरोपी नरेश हे सख्खेभाऊ असून त्यांची सामायिक शेत जमीन मोठा भाऊ परेश याने आपल्या नावे करून घेतली होती. तर घर सुद्धा आपल्या नावे केले होते. या गोष्टीचा राग मनात धरून छोटा भाऊ नरेश याने दहा लाख रुपयांची आपल्या भावाच्या हत्येची सुपारी केळवा पालघर येथील गुंडांना दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT