डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्यासह डॉ. वैभव साळुंखे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करणाऱ्या प्रकरणातील शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्यासह उर्वरित चारही आरोपींची ओळख परेड मंगळवारी दुपारी कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्या समक्ष आधारवाडी कारागृहात पार पडली.
अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या ओळख परेडच्या वेळी पीडित डॉ. साळुंखे यांनी आरोपी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर चारही आरोपींना अचूक ओळखल्याची माहिती डॉ. साळुंखे यांचे वकील अॅड. अभिनय अडसुळ यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर रुग्णालय हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे. रमेश म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केली आणि वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली, या सर्व प्रकाराबद्दल उच्च न्यायालयाने वेळोवेळी तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत रमेश म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींना जामीन देण्यास इन्कार केला आहे.
कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीनंतरही डॉ. वैभव साळुंखे यांनी आईसह डोंबिवलीहून वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी न्यायालयासमोर जबाब देण्यासाठी अनेकवेळा डॉ. साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. मात्र सुरक्षेची हमी मिळत नसल्याने ते जबाबासाठी न्यायालयात येत नव्हते. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांचा जबाब वाशिम येथील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलीस बंदोबस्तात नोंदविण्यात आला. ओळख परेड करण्यासाठी डॉ. साळुंखे यांना कल्याणला आणताना पोलीस बंदोबस्त मिळणे आवश्यक असल्याची मागणी त्यांचे वकील अॅड. अभिनय अडसुळ यांनी केली होती. त्याची दखल घेत डॉ. साळुंखे यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आणण्यात आले.
मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी, तुरुंगाधिकारी यांच्या उपस्थितीत कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्या समक्ष डॉ. वैभव साळुंखे यांना ओळख परेडसाठी आरोपी रमेश म्हात्रे (७१) सह सहआरोपी रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश उद्धव निकम (३५), अक्षय कारंडे (३०) आणि साधना कारंडे (५२) यांच्या समोर उभे केले. त्यावेळी डॉ. साळुंखे यांनी शिवीगाळ करत मारहाण करणारे हेच इसम असल्याचे तपास यंत्रणेला सांगितले. तपासादरम्यान आरोपींकडून पीडित डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांना धमक्यांचे फोन आल्याचा मुद्दाही समोर आला आहे. तपास यंत्रणेने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे.
दबाव टाकणाऱ्यांचीही चौकशी होणार डॉ. वैभव साळुंखे यांना कर्तव्यावर असताना रुग्णालयात मारहाण केल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्या चिथावणीवरून काही अज्ञातांनी तब्बल ९४ वेळा फोन कॉल्सद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आता तपासादरम्यान उघडकीस आले आहे. हे सर्व कॉल्स डॉ. साळुंखे यांना त्यांच्या मोबाईलवर आल्याचे तांत्रिक तपासातून उघड झाले आहे. अनोळखींनी टाकलेल्या अशा पद्धतीच्या दबावामुळे जीवाच्या भीतीपोटी डॉ. साळुंखे यांनी त्यांचा मोबाईल काही दिवस बंद ठेवला होता. या फोन कॉल्सची तांत्रिक चिकित्सा तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. दबाव टाकणाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.