ठाणे : ठाणे महापालिकेचे लाचखोर माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शंकर पाटोळे यांच्यासह तिघांचा जमीन अर्ज ठाणे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. त्यामुळे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती पाटोळे यांच्या वकिलांनी दिली आहे. पाटोळे यांच्यासह तिघांचा जमीन अर्ज फेटाळल्याने तिघांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नौपाड्याच्या एका खासगी जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी बिल्डरकडून 50 लाखांच्या लाचेची मागणी करीत 25 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांना पालिकेच्या वर्धापनदिनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला. सोमवारी न्यायालयाने पाटोळे, गायकर आणि सुर्वे या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
बुधवारी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे सुट्टीवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. गुरुवारी सुनावणी दरम्यान हे मनी लॉण्डरिंगचे प्रकरण आहे का? असा प्रश्न पाटोळे लाच प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला विचारला. त्यावर स्पष्टीकरण देताना त्या अधिकाऱ्याला इन्व्हीस्टीगेशन शब्दच उच्चारता आला नसल्याने तपास अधिकाऱ्याला न्यायमूर्ती शिंदे यांनी फैलावर घेतले होते. तर शुक्रवारी जामिनावरील सुनावणीला पुन्हा ब्रेक लागला असून पाटोळे व इतर दोन आरोपींचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, ठाणे न्यायालयाने तपासासंदर्भात ठाणे एसीबीवर पुन्हा नाराजी व्यक्त केली.
एसीबीच्या तपासावर पुन्हा ताशेरे...
सलग चार दिवस पाटोळे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे किमान शुक्रवारी तरी शंकर पाटोळे यांना जामीन मिळेल, अशी अशा पाटोळे यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत होती. मात्र एसीबीच्या तपासावर पुन्हा एकदा शुक्रवारी न्यायालयाने ताशेरे ओढले. पाटोळे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जामिनावर काय निकाल लागतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.