डोळखांब (ठाणे): दिनेश कांबळे
शहापूर या ग्रामिण तालुक्यात पाणीटंचाई काळात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचे दोन वर्षाचे सात कोटी पन्नास लाख रुपयांचे देयक थकले असल्याचे संबंधित पाणी पुरवठा विभाग तसेच ठेकेदारांकडून सांगितले जाते.
शहापूरसारख्या अतिदुर्गम भागात भातसा, वैतरणा, मध्यवैतरणा, तानसा यासारखी मोठाली जलाशये ठाणे, मुंबई सारख्या शहरांना दररोज हजारो दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करीत असतात. मात्र या पाण्याचे पावसाळ्यानंतर योग्य नियोजन होत नसल्याने तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांना या पाण्याचा काडीमात्र उपयोग होत नाही. तसेच जलस्वराज्य, भारत निर्माण, जल जीवन योजना या देखील कागदावरच पूर्ण झाल्या असून संबंधित अधिकारी वर्गाला योजनांच्या रिवाईज इस्टीमेंट तयार करण्यात जास्त स्वारस्य जाणवते, तर ही रिवाईज इस्टीमेंटची काम देखील मंजूर होत नाहीत.
त्याचप्रमाणे जल जीवन आणि भावली योजनांच्या कामाचे आजही जागांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतमधील नागरिकांच्या माथी पाणीटंचाई कायम आहे. दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यात सर्व योजना प्रगतीपथावर आहेत. पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे, असा शेरा मारला जातो. मग दरवर्षी दहा ते बारा कोर्टीचा आराखडा तयार करून अधिकारी कोणती टंचाई दूर करतात. हा सर्वसामान्य नागरिकांना न उलगडणारा प्रश्न आहे.
मागील २०२४-२५ मध्ये तालुक्यातील १९८ गावपाड्यांना ४२ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. तर २०२५-२६ मध्ये १३० गावपाड्यांना ३९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. या सर्व टँकर मालकांनी इंधन खर्च निकषाप्रमाणे स्वतःचे खिशातून खर्च केला होता. मात्र दोन वर्ष उलटूनही शासनाकडे आर्थिक तरतूद नसल्याने सात कोटी पन्नास लाख रुपये टँकर मालकांचे बिल थकले असल्याने दरवर्षी ही तक्रार असते.
दर महिन्याला कार्यालयामार्फत आम्ही कागदोपत्री मागणी करीत असतो. पण, लवकरच टंचाईची देयके प्राप्त होतील.विजया पांढरे, उपअभियंता, पंचायत समिती, पाणी पुरवठा विभाग
पुढील वर्षी जास्त पाणीटंचाईचे संकेत
टँकरने पाणी पुरवठा करण्याचे बिल हे वर्ष दोन वर्ष थकविले जात असेल, तर यापुढे टैंकर मालक निविदा भरणार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे पुढील वर्षी यावर्षीच्या तुलनेत जास्त पाणीटंचाई जाणवणार आहे. तर कामांची मुदत संपूनही पाणी योजना कागदावरच धुळखात पडल्या आहेत.