धरणांच्या शहापुरात टँकरमुक्ती केव्हा ? pudhari photo
ठाणे

Thane water shortage : धरणांच्या शहापुरात टँकरमुक्ती केव्हा ?

110 ग्रामपंचायती, चारशे पाणी योजना, चार जलाशय तरीही पाण्याचा ठणाणा

पुढारी वृत्तसेवा

डोळखांब : दिनेश कांबळे

भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा अशी मोठाली जलाशय, तसेच आतापर्यंत विविध चारशे पाणी योजना तरीही शहापुर तालुक्यात गेली वर्षानुवर्षे तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. तसेच करोडो रूपयांचा आराखडा मंजुर करावा लागत आहे, ही बाब म्हणजे तालुक्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे.

शहापुर तालुका हा दर्याखोर्यांनी व्यापलेला व भौगोलिक दृष्टया मोठा तालुका असुन दरवर्षी मुबलक पर्जन्यवृष्टीची नोंद तालुक्यात होत असते. तसेच भातसा, वैतरणा, तानसा, मध्यवैतरणा यासारख्या धरण क्षेत्रात ही पाऊस मुबलक असतो. लवकरच ही धरण तुडुंब भरून वाहतात. तसेच तालुक्यात 110 ग्रामपंचायती, 3 लाख 34 हजार लोकसंख्या, आणी जलसंधारण, वनविभाग, तालुका कृषी विभागा कडुन प्रत्येक वर्षी पाचशे कोटीपर्यंत धरणांची काम केली जातात. परंतु आजही एकाही धरणात थेंबभर देखील पाणी नसुन यामुळे ना भूगर्भातील पाणी पातळी वाढली.

ना जंगलातील पशु पक्षी यांना पिण्यासाठी पाणी रहात. ना मानवासाठी या पाण्याचा काडीमात्र उपयोग होतो. याचाच अर्थ या बंधाऱ्याचे कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असुन संबंधित अधिकारी व ठेकेदार पोसण्यासाठी कोणत्या ही प्रकारचे नियोजन नकरता ही काम केली जात आहेत. हे देखील टंचाई मागचे खरे कारण मानले जाते.

कारण जलसंधारण विभाग शहापुर यांचे मार्फत यावर्षी चोंढे, मालद, डोळखांब, किन्हवली यासांरख्या 15 जि.प.गटात अंदाजे पाचशे कोटी रूपयांची कामे केली जात आहेत. परंतु प्रत्येकी पन्नास ते साठ लाखांचे काम करत असतांना जलस्रोताची नोंद, सात बारा, ठराव, तांत्रिक अहवाल या बर्याच गोष्टींची पुर्तता नकरता प्रस्तावित ठिकाणी काम सुरू नाहीत. तर सर्रास या कामांमध्ये मोठ्याप्रमाणात दगडांचा वापर केला जातो.

आतापर्यंत केलेला एकही बंधारा अस्तीत्वात नसतांना बोगस बिल काढली जात आहेत. याकरीता या कामांचा गुण नियंत्रण विभागाकडून दर्जा तपासले शिवाय बिल अदा करणे चुकिचे ठरणार आहे. ही काम साठ चाळीस तत्त्वावर बोगस सुरू असल्यामुळे देखील पाणी टंचाई निर्माण होत आहे. जलस्रोत आटत आहेत.

त्यापेक्षा ही भयानक म्हणजे सन 2004 पासुन आतापर्यंत तालुक्यात जल स्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल यासारख्या दोनशे योजना केवळ कागदावरच पुर्ण झाल्या तर सद्याच्या जल जिवन मिशनच्या दोनशे पाणी योजना मुदत संपुनही कागदावरच आहेत. प्रत्यक्षात कामांचे तिन तेरा वाजले आहेत.

भावली योजनेवर प्रश्न चिन्ह; दरवर्षी करोडोंचा आराखडा

भावली योजनेची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. याचे मुख्य कारण यापुर्वी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करणारे लोक तसेच अधिकारी, विविध पक्षाचे नेते यांचेकडे तालुक्यासाठी असणारे पाण्याचे सुयोग्य नियोजन नव्हते. त्यावेळी कमुनिष्ट पक्षाने टाकिपठार याठिकाणी तालुक्यासाठी पाणी परिषदेचे आयोजन केले होते.

सद्यस्थितीत तालुक्याला पाणी टंचाई जाणवु नये याकरीता भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे हे वारंवार संबंधित अधिकारी तसेच मंत्र्यासोबत बैठका व बोलणी करून टंचाई परिस्थिती दुर करण्याचे प्रयत्नात आहेत. आजमितीस तालुक्यात फेब्रुवारीपासुनच चार टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असुन कसारा, वेळुक, धामणी, यांसारख्या चार ते पाच ग्रामपंचायत मधील दोन गावे व आठ पाड्यांना चार टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. काल खासदार म्हात्रे यांचे प्रयत्नाने अजनुप ग्रामपंचायतमधील उठावा याठिकाणी तातडीने टँकर सुरू करण्यात आला असुन टक्केवारीच्या गर्तेत अडकलेल्या पाणी योजनांचे संदर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • जूनअखेर पर्यंत तालुक्यात 44 टँकरची आवश्यकता असून, मागील वर्षी देखील 44 टँकरने तालुक्यात पाणी पुरवठा करण्यात आला होता. कारण आजही तालुक्यातील डोळखांब, टाकिपठार, कसारा, कोथळा,कळभोंडा, साकडबाव, खराडे, किन्हवली, यासारख्या ग्रामीण भागात रात्रभर जागून, दोनतास पायपीट करून तसेच तसेच मुख्य रस्ता ओलांडुन डोक्यावर दुडीने तसेच सायकल, बैलगाडी, दुचाकीने रात्री अपरात्री पाणी आणावे लागते. अशावेळी बर्याचदा सुरक्षेचा, जीविताचा प्रश्न निर्माण होतो. तर यापूर्वी पाण्यासाठी जीवही गमवावा लागल्याचे घटना तालुक्यात घडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT