डोळखांब : भिवंडीच्या शासकीय गोदामातून शहापूर तालुक्यातील अघईच्या रेशन दुकानात जाणारे धान्य काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी चाललेला ट्रक शहापूर पोलिसांनी अडवून जप्त केला आहे. रात्री उशिरा शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक एजाज शहा याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
तब्बल 165 क्विंटल गहू व तांदूळाचे कट्टे भरलेला ट्रक शहापुरातील एका खासगी गोडाऊन समोर कसा काय? याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून नेणाऱ्या धान्य तस्करांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यातील अघई येथील रेशन दुकानात जाणाऱ्या ट्रकमध्ये 160 क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल गहू असा 165 क्विंटल धान्य साठा होता. हे धान्य भिवंडी येथील शासकीय गोदमातून शहापूर तालुक्यातील अघई येथील रेशन दुकानात जाणार होते. अशी माहिती शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा अधिकारी अमृता सूर्यवंशी यांनी दिली. मात्र ट्रकचालकाने धान्याने भरलेला ट्रक काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अघई येथील रेशन दुकानात जाण्याऐवजी शहापुरातील इंग्लिश मिडीयम स्कूल समोर असलेल्या एका खासगी गोडाऊनलगत उभा केला. शहापूर पोलिसांना याबाबत संशय आल्याने पोलिसांनी ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
याबाबत तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक वितरणासाठी असलेल्या धान्याचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने दिलेल्या मार्गात बदल केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक चालक एजाज याला अटक करण्यात आली आहे.
नेमके गौडबंगाल काय
ट्रकमधील तांदळाचे 50 क्विंटल वजनाचे 320 कट्टे असे 160.00 क्विंटल तांदूळ व गव्हाचे 10 कट्टे असा पाच क्विंटल गहू असा एकूण 165.00 क्विंटल धान्यसाठा ट्रकसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. दरम्यान, संबंधित प्रकरणात तहसीलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा निरीक्षक यांनी सारवासारव करून सुरुवातीला वेळ मारून नेली मात्र तद्नंतर याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने यामध्ये नेमके गौडबंगाल काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
सखोल चौकशीची मागणी
शहापूरच्या गोदामातून तालुक्यातील रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा होणे क्रमप्राप्त असताना भिवंडी येथून थेट शहापूरच्या रेशन दुकानात धान्याची वाहतूक करण्यात येत असल्याने तसेच एकाच दुकानात तब्बल 165 क्विंटल धान्य वितरित होत असल्याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे. तसेच धान्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची तसेच या संबंधित असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, रेशन दुकानदार, गोदामपाल यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.