ठाणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या 2026 च्या अंतरिम निकालात शहापूर तालुक्याने जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळवत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पाचवीच्या परीक्षेत तालुक्यातील 256 विद्यार्थी पात्र ठरले असून आठवीच्या परीक्षेत 8 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. मर्यादित साधनसामग्री, आदिवासी व दुर्गम भागातील शाळा आणि ग्रामीण पार्श्वभूमी असूनही मिळालेल्या या यशामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा शहापूर पॅटर्न चर्चेत आला आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अस्नोलीने यंदाही उल्लेखनीय कामगिरी करत 30 विद्यार्थी पात्र ठरवले. जिल्ह्यातील अनेक शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष नियोजन, अतिरिक्त वर्ग, सराव परीक्षा आणि गटअभ्यास यावर भर दिला. शिक्षक, सामाजिक संस्था आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र आहे.
शहापूर तालुका नॉलेज अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थ्यांचा गौरव तसेच सराव परीक्षांसाठी आर्थिक मदत दिली जाते. श्री सत्यसाई सेवा संस्था तलवाडे-ठाणे, सेवा सहयोग संस्था आणि फॅन्ड्री फाउंडेशन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तके व प्रश्नसंच मोफत उपलब्ध करून दिले. जाणीव प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान आणि स्व. काशिनाथ भोईर प्रतिष्ठान यांनी स्वतंत्र सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
आदिवासी उन्नती मंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांना दर रविवारी शहापूर येथे बोलावून तज्ज्ञ शिक्षकांकडून मोफत मार्गदर्शन केले जाते. अनेक प्राथमिक शिक्षक या उपक्रमात विनामूल्य सेवा देत आहेत. याशिवाय यशस्वी विद्यार्थ्यांचा दरवर्षी रोख पारितोषिक देऊन गौरवही केला जातो.
ज्ञानकुंभ टीमचे सुधाकर पाटील यांनी सांगितले की, नियोजनबद्ध प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सरावामुळे शहापूर तालुका राज्यात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणारा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. याच विद्यार्थ्यांनी पुढे जेईई मेन्स, जेईई ऍडव्हान्स सारख्या परीक्षांमध्येही यश मिळवले असून 35 हून अधिक विद्यार्थी आयआयटी आणि एनआयटी मध्ये पोहोचले आहेत.
शेलवली बांगर येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी जिया हलपतराव हिने मिशन भरारी, एनएमएमएस आणि शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. शाळेत नियमित जादा तासिका, प्रश्नमंजुषा आणि विशेष वर्ग घेतले जात होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले, असे तिने सांगितले.
तर आष्टे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी जितेंद्र रवि करण याने नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि मंथन प्रज्ञाशोधमध्ये यश मिळवले. पहाटेचा अभ्यास, गटअभ्यास, ऑनलाइन मार्गदर्शन आणि नियमित सराव परीक्षांमुळे आत्मविश्वास वाढला,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
जिल्हाभर “शहापूर पॅटर्न” राबवणार
शिष्यवृत्ती प्रक्रियेतील शहापूर तालुक्याचा अनुभव आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मिशन भरारी, एनएमएमएस आणि नवोदय शिष्यवृत्ती परीक्षांसाठीही या पद्धतीचा उपयोग होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी शिक्षक, पालक आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.