Shahapur Planetarium Pudhari
ठाणे

Shahapur Planetarium: ठाणे जिल्ह्यातील पहिली ‌‘तारांगण वेधशाळा‌’ शहापुरात; रविवारी उद्घाटन

खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या हस्ते रविवारी पार पडणार उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

संतोष दवणे

किन्हवली: ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण, वेधशाळा शहापुरात सुरू होत आहे. ग्रहगोल निरीक्षणासाठी सुसज्ज असे तारांगण आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी वेधशाळा असणार आहे. रविवारी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.

निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या खगोलशास्राची आवड असलेल्या ठाकूर बंधूनी साडेतीन एकर जागेत सॅपो नावाचा हा दुर्मिळ प्रकल्प आकारास आणला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा धरणे, माहुली किल्ला, आजोबा पर्वत, तानसा अभयारण्यासाठी ओळखला जाणारा निसर्ग समृद्ध तालुका मानला जातो. मात्र ठाकूर बंधूंच्या सॅपो प्रकल्पामुळे तारांगण आणि वेधशाळा असलेला तालुका अशी नवी ओळख शहापूरला मिळणार आहे.

शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावर जुनवणी-कोठेरा रोडवर पोकळेवाडी येथे निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी साडेतीन एकर जागेवर एक सुसज्ज तारांगण आणि चार अत्याधुनिक मोठ्या दुर्बीणी असलेली वेधशाळा उभी केली आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या रविवारी सायंकाळी 5 वाजता खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आ. दौलत दरोडा यांच्या हस्ते होत आहे. निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोल शास्त्राची असलेली आवड आणि जनमानसात खगोलविज्ञानाची रूची निर्माण व्हावी ही त्यांची तळमळ यातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी एक नवी पर्वणी ठरू शकेल, असा सॅपो प्रकल्प साकारला आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून खगोलविज्ञानप्रेमींसाठी हा प्रकल्प अवकाश निरीक्षणाचे नवे दालन खुले करणार आहे.

सोलर फिल्टर लावलेल्या एका दुर्बिणीतून दिवसा सारडा, सौरज्वाला निरीक्षण करता येणार असून दोन दुर्बिणी संगणकाला जोडलेल्या असल्याने त्यातून दिसणाऱ्या गोष्टींचे छायाचित्रणही करता येणे शक्य होणार आहे. प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावरही अवकाशातील गोष्टी दाखविण्याची सोय उपलब्ध आहे.

दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्र, गुरू ग्रहावरील पट्टा, डाग, शनी ग्रहाची वलये, देवयानी दीर्घिका यांचे विलोभनीय दर्शन घडत असल्याची माहिती निलेश ठाकूर यांनी दिली आहे. रात्री आकाश निरीक्षण करणाऱ्यांसाठी मुक्कामाची सोय करण्यात आली असून या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हॉल, सेल्फी पॉइंट्स, कॅन्टीन सुविधेसह आकाश निरीक्षणासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचीही व्यवस्था केली असल्याचे समजते. विशेष म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील एक दिवस मोफत आकाश निरीक्षण व शो ठेवला जाणार असल्याचे निलेश ठाकूर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले आहे.

सॅपो प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • अत्याधुनिक तारांगणामध्ये

  • 56 आसनांची व्यवस्था

  • मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा अर्धा ते एक तासाचा शो दाखविण्याची सोय.

  • वेधशाळेत 16, 14, 10 व 6 इंच व्यासाच्या चार मोठ्या अत्याधुनिक दुर्बिणी.

  • आकाश निरीक्षणासाठी बटन दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय.

“ 2016 पासून खगोलशास्त्राच्या अभ्यासाची सवय लागली आणि त्यातूनच हा सॅपो प्रकल्प आकारास येत आहे. समुद्र सपाटीपासून उंचीवर व लोकवस्तीपासून अंतरावर असे योग्य ठिकाण शहापूरमध्ये मिळाल्याने साकडबाव पठाराची निवड केली आहे. खगोलप्रेमींनी या प्रकल्पाचा अवश्य लाभ घ्यावा.”
- निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर सॅपो प्रकल्पप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT