नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी खड्ड्यांनी व्यापलेल्या महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली Pudhari
ठाणे

Shahapur Protest | नारीशक्तीने तीन तास रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; खड्ड्यांतच साजरी केली मंगळागौर

शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या कथित उदासीनतेचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

Shahapur Murbad Road Potholes

शहापूर : शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या कथित उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील महिलांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच संतप्त महिलांनी खड्ड्यांनी व्यापलेल्या महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली. यावेळी महिलांनी रस्त्यावरच पारंपरिक मंगळागौर खेळत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कारभाराचा निषेध केला.

या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली. विशेष म्हणजे आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही एमएसआरडीसीचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे किती गांभीर्य आहे, असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला.

आठ वर्षांपासून काम रखडल्याने संताप

एमएसआरडीसीच्या अखत्यारित सन २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य, चिखल आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले.

या महामार्गावरून शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. घराबाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही, अशी चिंता आता प्रत्येक कुटुंबाला वाटत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आमदार-खासदारांच्या कार्यक्षमतेवर सवाल

महामार्गाचे काम आठ वर्षांपासून रखडले असताना आमदार आणि खासदारांना नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या वेदना दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल महिलांनी केला. वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलने करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने अखेर महिलांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.

लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित

यापूर्वीही महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मंगळागौरीच्या दिवशीच आंदोलन करण्यात आले. अखेर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार सदानंद घुटे आणि पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

दिलेल्या निर्धारित वेळेत महामार्गाचे काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल, असा इशारा चंद्रकला दुर्गे यांनी दिला.

शेकडो महिलांचा सहभाग

या आंदोलनाला नडगाव, भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली, शेंद्रूण आदी गावांतील महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी विद्याताई वेखंडे, डॉ. अपर्णा खाडे, पुष्पा पानसरे, चंद्रकला दुर्गे, कमल रेरा, आशा मांजे, अनिता हरड, दर्शना भालके, सुनीता पवार, विजया बेलवले, हर्षला जागरे, सविता विशे, रेखा जागरे, जुही पवार, दीपिका भालके, वंदना हरड, भारती कदम, राधिका हरड, सारिका फर्डे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT