राजेश जागरे
शहापूर: शहापूर तालुक्यातील गावांमध्ये तसेच कातकरी आदिवासी वाड्यांमध्ये मोबाईल गेमचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनत आहे. अनेक लहान मुले रात्री उशिरापर्यंत अगदी दोन-तीन वाजेपर्यंत मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षणाच्या व विश्रांतीच्या वेळेत मोबाईल गेमला प्राधान्य दिले जात असल्याने पालक, शिक्षक आणि समाजातील जाणकार व्यक्तींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी गाव - पाड्यातील अनेक मुले एकत्र बसून मोबाईलवर गेम खेळताना दिसून येतात. शाळकरी वयातील ही मुले रात्री उशिरापर्यंत जागी राहत असल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपुरी झोप, अभ्यासाकडे दुर्लक्ष, डोळ्यांचे विकार तसेच सामाजिक व कौटुंबिक संवाद कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. विशेषतः कातकरी समाजातील मुलांसाठी शिक्षण हा विकासाचा महत्त्वाचा मार्ग मानला जात असतांना मोबाईल गेमचे वाढते आकर्षण त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.
पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे, अभ्यास व खेळासाठी निश्चित वेळ देणे आणि मुलांना क्रीडा, वाचन तसेच सांस्कृतिक उपक्रमांकडे वळविण्याची गरज व्यक्त होत आहे. जाणकारांच्या मते मोबाईल हे ज्ञानाचे साधन असला तरी त्याचा अतिरेक मुलांच्या प्रगतीस अडथळा ठरू शकतो. त्यामुळे पालक, शिक्षक, ग्रामपंचायत आणि समाजातील जबाबदार घटकांनी एकत्रितपणे जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.
गेममध्ये वेळ घालवता असल्याने पुढे त्यांच्याच भविष्याचा खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत जागरणामुळे आरोग्यावर परिणाम,अभ्यासाकडे दुर्लक्ष, मोबाईल व्यसनामुळे सामाजिक संवादच होत नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान पालकांनी मोबाईल वापरासाठी वेळेची मर्यादा ठरवावी. परिणामी बालपण वाचवायचे असेल तर मोबाईलच्या अतिरेकावर नियंत्रण आवश्यक आहे.असा सूर समाजातील जाणकार व्यक्तींमधून उमटत आहे.