Thane heavy rain pudhari photo
ठाणे

Thane heavy rain : शेकडो पक्ष्यांचा दुर्दैवी बळी

शहापूरमध्‍ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; घरे, शेतीचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : शहापूर तालुक्यात बुधवारी संध्याकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका घरे, शेतीसह मुक्या पक्षांनाही सहन करावा लागला. वादळी वाऱ्याच्या तडाख्‍याने शहापूर परिसरातील शेकडो पक्ष्‍यांनाही आपले जीव गमवावे लागले. या मुसळधार वादळी, वाऱ्यामुळे पक्ष्‍यांचे दुर्दैवी बळी गेले.

बुधवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला वादळी वाऱ्याचा तडाखा शहापूरला बसला आणि तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत केले. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली. विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठाही बाधित झाला होता. या वादळात पंचायत समिती आवारात तसेच इतर ठिकाणी शेकडो पक्ष्यांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

या चक्रीवादळाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेे. नुकसानीची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी भाजपचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे. शहापूर पंचायत समितीच्या आवारात वादळी वाऱ्यामुळे झाडे थेट विद्युत तारांवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

तथापि स्थानिक पोलीस प्रशासन, विद्युत कर्मचारी व जीवरक्षक टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून पडलेली झाडे व विद्युत तारा हटवून वीजपुरवठा सुरळीत केला. तसेच शहापूर शहरातील फॉरेस्ट ऑफिसजवळ तीन-चार झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

शेलवली रस्त्यावर विद्युत तार तुटल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. बुधवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, पावसाने हाहाकार उडाला. राहुलनगरमध्‍ये गारांचा पाऊस झाल्याने झाडे कोसळली तसेच काही इमारतींचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली.

तातडीने पंचनामे करण्‍याची मागणी

शहापूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा जनसेवक पांडुरंग बरोरा यांनी अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी तसेच गरीब जनतेचे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेतली. त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई व मदत मिळावी, अशी मागणी करत प्रशासनाकडे जनतेची बाजू ठामपणे मांडली.

वादळी वाऱ्यामुळे शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक घटना आहे. पक्षी हे आपल्या पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. मृत पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच वनविभागाने या घटनेची पाहणी करून नेमका मृत्यू कशामुळे झाला, याची नोंद घ्यावी. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास व आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
भूषण विशे, पक्षीप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT