Shadu clay Ganesh idols Pudhari
ठाणे

Shadu clay Ganesh idols: गणेशमूर्तिकारांना शाडूच्या मातीची प्रतीक्षा; मूर्तींच्या दरातही वाढ

शाडूच्या मूर्तिकारांपुढे रेडिमेड गणेशमूर्ती विक्रेत्यांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

अनुपमा गुंडे

ठाणे: शाडूची माती घडविण्यासाठी लागणारा वेळ, नंतर त्या मूर्तीवर रंगकाम करण्यासाठी आणि मूर्ती सुकविण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता राज्यातील पारंपारिक मूर्तीकारांना एप्रिल-मे मध्येच शासनाच्या वतीने माती मिळणे आवश्यक आहे, मात्र मे महिना संपत आला तरीही शासन स्तरावर शाडू मूर्तीकारांना गणेशमूर्ती घडविण्यासाठी माती देण्यासाठी काही महापालिकांनी मे महिन्याच्या प्रारंभापासून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

तर काही महापालिका आणि नगरपालिका स्तरावर पूर्णतःहा अनास्था असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेच्या भरवशावर बसण्याऐवजी अनेक मूर्तिकारांनी खुल्या बाजारातून शाडूची माती विकत घेण्यास प्रारंभ केला आहे.

यंदा शाडूच्या मातीच्या दरात गोणीमागे 50 रूपयांनी वाढ झाली असली तरी पेट्रोल - डिझेलच्या किंमती चढ्या राहिल्या तर मातीचा दर वाढण्याची शक्यता आहे, पर्यायाने गणेशमूर्तीच्या वाढत्या किंमती झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार असल्याने शासनाने मुर्तीकारांना पावसाळ्याआधी शाडूची माती वितरित करण्याची मागणी मूर्तीकारांच्या संघटनांनी केली आहे.

गणेश मूर्ती शाडूच्याच की प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या हा वाद न्यायालयाच्या अधीन आहे, परंतू पर्यावरणपूरक गणेशमूर्तीना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मूर्तीकारांना शाडूची माती मोफत देण्याचा श्रीगणेशा केला आहे.

मात्र मूर्तीकारांना किती प्रमाणात माती द्यायची काय याचे प्रमाण नाही, त्यामुळे भूछत्राप्रमाणे ऐनवेळी अनेक मूर्तीकार उगवत असून ते पालिका, नगरपालिकांकडून शाडूची माती घेवून त्यातून दिखाव्यापूरत्या तीन-चार मूर्ती घडवून उरलेली माती विकण्याचा प्रतापही करत असल्याचा दावा काही पारंपारिक मूर्तीकारांनी केला आहे.

शाडूच्या मातीची एक गोणी 40 किलोची असते. एका गोणीत दीड फूटाच्या 4 तर दोन फूटाच्या तीन मूर्ती घडविता येतात. मुंबई, ठाणे महानगरांमध्ये गणेशमूर्तीच्या कारखान्यांमध्ये महापालिकांकडून मिळणारी माती पुरेशी नसतेच, त्यामुळे पालिकेच्या भरवशावर न बसता अनेक मूर्तीकारांनी गणेशमूर्तीचे काम सुरू केले आहे.

गेल्या वर्षी ठाणे महापालिकेने आम्हांला मार्च मध्येच माती दिली होती. आता सगळ्या मूर्ती शाडूच्याच करायच्या की नाही याबाबत न्यायालयाच्या निकालाची मूर्तीकारांना प्रतीक्षा आहे. शाडूची माती मळण्यासाठी आणि मूर्तीला आकार देणे हे मेहनतीचे काम आहे. त्यावर रंगकाम आणखी मेहनतीचे. शाडूच्या मातीला जास्त प्रमाणात हवा आणि ऊन दोन्ही गोष्टी चालत नाही, कारण माती लगेच तडकते, त्यामुळे मूर्तीत हवी तशी सुबकता येत नाहीच आणि मूर्ती घडविण्यासाठी दुप्पट वेळ द्यावा लागतो, त्यामुळे महापालिकांनी आता मूर्तीकारांना माती द्यायला हवी, कारण आम्ही दरवर्षी मेहनतीने 100 टक्के शाडूच्या मूर्ती घडवितो, परंतू रेडिमेड मूर्ती विकणारे कमी दर्जाच्या आणि स्वस्तातल्या मूर्ती विकून नफा कमावतात. त्यामुळे पालिकांनी माती आणि जागा देतांना संघटनांच्या सभासदांना माती द्यावी अशी आमची मागणी आहे, सरकारने तशी तरतूद शासकीय अध्यादेशात करावी, अशी आमची सूचना आहे
- मंगेश पंडित पारंपारिक मूर्तीकार व हस्तकला कारागीर संघ
मुंबई महापालिकेने शाडूच्या मातीसाठी अर्ज मागवले असले तरी अजून पालिकेकडून काही उत्तर आलेले नाही. बाजारात चांगल्या शाडूच्या मातीत 100 ते 150 रूपयांनी वाढ झालेली आहे. शाडूच्या मूर्तीवर लागणार्या वॉटर कलरचे दर वाढले आहेत, कारागीराला दिवसाला 1200 ते 1500 रूपये मजूरी द्यावी लागते. पेट्रोल - डिझेलच्या दरात वाढ झाली तर या सगळ्या किंमती वाढतील त्यामुळे पालिकेने मूर्तीकारांना वेळेत माती द्यावी.
- राजन पाटकर, मूर्तीकार - गिरगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT