श्री मलंगगड परिसरात धुळीचा कहर शिगेला pudhari photo
ठाणे

Air pollution in Malanggad : श्री मलंगगड परिसरात धुळीचा कहर शिगेला

प्लांटच्या धुळीमुळे विद्यार्थी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरात निर्माण झालेल्या प्लांटच्या धुळीमुळे मलंगगड परिसर गुदमरला असून यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. श्री मलंगगडवाडी ते करवले गावादरम्यानच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उठणारी प्रचंड धूळ आणि प्लांटमधून बाहेर पडणारे सूक्ष्म कण दिवसेंदिवस वाढत असून परिसर धुळीच्या सततच्या धुरकट वातावरणात गच्च अडकून पडला आहे.

या मार्गाचा उपयोग शालेय विद्यार्थी, नोकरदार कामगार, शेतकरी तसेच स्थानिक ग्रामस्थ रोजच्या प्रवासासाठी करतात. मात्र, वाढत्या धुळीच्या प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ लागले असून श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, अंगावर चिखलमिश्रीत धूळ बसणे यांसारख्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.

श्री मलंगगड वाडी ते करवले रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूंनी आरएमसी प्लांटशी संबंधित कंटेनर, ट्रक आणि मालवाहू वाहने उभी असल्याने धूळ रस्त्यावरच साठून राहते. वाहनांच्या चाकांखाली ही धूळ पुन्हा हवेत उडून वातावरणात तरंगत राहते. त्यामुळे दिवसा देखील रस्त्यावर दाट धुळीचे ढग पसरलेले दिसतात आणि काही अंतराच्या पलीकडे नजरही पोहोचत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नाकावर रुमाल दाबून, डोळे मिटूनच मातीच्या या धुरकट रस्त्यातून वाट काढावी लागते. कामगार वर्गालादेखील दररोज या धुळीतून प्रवास करताना श्वसनाचा त्रास जाणवतो.

स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या असून नियमबाह्य परवानग्यांची चौकशी करावी, धुळीवर नियंत्रणासाठी पाणी फवारणी, रस्त्यांची स्वच्छता आणि वाहतूक शिस्त लागू करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. परिसरातील नैसर्गिक वातावरणाचेही यामुळे मोठे नुकसान होत असून झाडे, वनस्पती सर्वत्र पांढऱ्या धुळीने झाकली गेली आहेत.

प्लांटच्या अनियंत्रित धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असताना संबंधित विभागांकडून तातडीची कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात या भागात श्वसनविकार आणि प्रदूषणाशी संबंधित मोठी आरोग्यसंकटे उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरातील कुशिवली, श्रीमलंगगड करवले आदी परिसरात हे प्लांट सुरू आहेत. तर कल्याण तालुक्यातील धामटन गावाच्या हद्दीत देखील सर्रास विनापरवाना प्लांट सुरू करण्यात आले आहेत. महसूल विभाग अशा प्लांटकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT