मिरा रोड : थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये मानवी तस्करी आणि सायबर गुलामगिरीच्या जाळ्यात अडकवलेल्या 7 भारतीय नागरिकांची मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष-1 काशिमीरा यांनी केली आहे. त्यातील 3 जण या परिसरातील आहे. गुन्हे शाखेने तपास करून केंद्र सरकार आणि म्यानमारमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने या पीडितांना सुखरूप मायदेशी परत आणले आहे.
मीरा रोडच्या नयानगर परिसरातील सय्यद इरतीझा फजल अब्बास हुसैन आणि त्यांचा मित्र अम्मार असलम लकडावाला यांना आसिफ खान ऊर्फ नेपाळी आणि अदनान शेख यांनी बँकॉक (थायलंड) येथे फेसबुक कंपनीत दरमहा 30 हजार बाथ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांना बेकायदेशीरपणे म्यानमारमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर तेथे असलेल्या स्टिव्ह आण्णा आणि लिओ नावाच्या व्यक्तींनी पिडीतांना डांबून ठेवून, मारहाणीची भीती दाखवून परदेशी नागरिकांची सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले. जेव्हा पिडीतांनी हे काम करण्यास नकार दिला, तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 6 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी 27 मे 2025 रोजी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने तपास करून आतापर्यंत मीरा-भाईंदर, सुरत आणि विशाखापट्टणम येथून 4 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने ओळख पटवून 7 भारतीयांची सुटका केली.