कृष्णा जाधव : मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
आत्मज्ञानी सत्पुरुषाची लक्षणं आपण गतलेखात जाणून घेताना, नामस्मरण आणि त्याचे महत्व समजून घेतले. मनाची मानवी जीवनातील भूमिका, मोह, मानसन्मान सोडण्यासाठी त्याची भूमिका किती महत्वपूर्ण ठरते, विकार चक्र, विकल्पांचा त्याग, आसक्ती नाकारणे त्यावर विजय मिळवणे हे सत्पुरुषाठायीची लक्षणं आपण पाहत संत नेहमी आत्मानंदात तृप्त राहतात हे जाणून घेतले, हेच भगवंताच्या परमधामाला प्राप्त होतात, ते कसे व कोठे आहे? याविषयी आजच्या लेखात चिंतन...॥|
॥ श्री ॥
भगवंत जाणून घेण्याची इच्छा सर्व विश्वाच्या पाठीवरील मानव जातीत समान आहे. जगाच्या पाठीवरील सर्व धर्म सांप्रदायाच्या मानव जातीत भगवंताप्रतीची समान ओढ आढळून येते. ‘देव’ हा सर्व धर्म सांप्रदाय यांचं अंतिम साध्य आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी विविध उपासना मार्गाचा, कर्मकांडांचा अवलंब केला जातो. मंत्र-तंत्र मार्गाचा अवलंब करून भगवंताला साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
श्री ज्ञानेश्वरीमधून सांगितलेला मार्ग अधिक सुलभ व योग्य वाटतो; किंबहुना आहेच. भगवंताचं आपल्या जगण्यातले, जीवनातले अस्तित्व दर्शन वारकरी सांप्रदायाने जगाला दाखवले. ते अत्यंत चोखट व शुद्ध सात्विक विचारांच वैभव आहे. मागील लेखात ‘आत्मज्ञानी’ सत्पुरुषाची लक्षणे सांगितली होती. तेच सत्पुरुष परमधामाला पोहोचतात, ते परमपद कसे आहे, याविषयी आजचे तत्वचिंतन आहे.
‘स्वयंप्रकाशमान’ ही परमपदाची पहिली ओळख माऊली सांगतात. या पदास सूर्य, चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करत नाहीत. त्या ठिकाणी पोहोचल्यावर पुनः संसारचक्रात परत येणे नाही, असे सत्पुरुष ‘जीवनमुक्त’ होतात.
ते वस्तू की तेजोराशी| सर्व भूतात्मक सरीसी|
चंद्र-सूर्याच्या मानसीं| प्रकाशें जे ॥
सूर्ये आणि चंद्रे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात. ती परमात्म वस्तू दिव्य तेजाची राशी आहे. सर्व भूतमात्रांत ती वस्तू सम प्रमाणात आहे. त्या विशाल ज्ञानरूप प्रकाशामध्ये चंद्र सूर्यासह संपूर्ण विश्व लोप पावते, ज्याप्रमाणे सूर्योदय झाला असता चंद्रासह सर्व नक्षत्रे लोप पावतात.
ज्या वस्तूच्या ठिकाणी स्थूल, सूक्ष्म, द्वैत, अद्वैत असा कोणताही मिथ्या भास राहत नाही ते भगवंताचे परम निजधाम आहे.
तैसा जिये वस्तूच्या ठायीं|
कोण्हीच का अभासु नाहीं|
ते माझे निजधाम पाही| पाटाचे (मुख्य) गा ॥
भगवंत ही अनुभूती आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संत, सज्जन, प्रज्ञावंत, ज्ञानी, पंडित, दार्शनिक होऊन गेले त्यांनी भगवंताचे वर्णन करताना आप-आपली लेखनी अनेकार्थाने झिजविली. अगदी वेदही नेती-नेती म्हणू लागले. आपण तर सर्वसामान्य आहोत. पण तरीही भगवंत दर्शनाबाबत वारकरी सांप्रदायातील संतांनी केलेले भाष्य अत्यंत मूलगामी आहे. माऊलींनी जेंव्हा भगवंताचे दर्शन घेतले तेंव्हा ते म्हणाले,
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती| रत्नशीळ फाकती प्रभा|
अगणीत लावण्य तेजः पुंजाळले | न वर्णवे तेची शोभा ॥
श्री जगद्गुरु संत तुकोबाराय यांना पांडुरंगाचे दर्शन झाले तेव्हा ते म्हणाले,
देव माझा मी देवाचा | हीच माझी सत्यवाचा|
देव पाहायास गेलो| तेथे देवची हाबोनी ठेलो|
तुका म्हणे धन्य झालो| आज विठ्ठला भेटलो ॥
वरील दोन्ही अभंगात भगवंत भेटीचे वर्णन करताना एक साम्यत्व आहे. देव पाहिल्यानंतर दोन्ही संतांची अनुभूती समान पातळीवर जाते. द्वैत बाजूला सारले जाते आहे आणि अद्वैताचा साक्षात्कार होतो आहे. लावण्यमूर्ती चैतन्याचा साक्षात्कार आत्मानुभूतीकडे घेऊ न जातो आहे.
भगवंताला भेटल्यानंतर त्याच्या स्वरूपात विलीन होण्याची अगाध अनुभूती संतांनी घेतली आहे. शुद्ध आत्मज्ञानाने जे भगवंताशी एकरूप होतात; ते पुनर्जन्मापासून मुक्त होतात.
तेवी मजसी एकवर | जे जाले ज्ञानें चोखट |
तया पुनरावृत्तीची वाट | मोडली गा ॥
भक्तीज्ञानाच्या माध्यमातून एकदा भगवंत सापडला की, मग द्वैत संपून फक्त अद्वैताचा साक्षात्कार. परत पुनर्जन्म नाही. जन्म-मरणाच्या संकटातून कायमची सुटका.
याप्रसंगी अर्जुनाने श्रीकृष्णाने विचारलेला प्रश्न हा अत्यंत सुंदर व तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना पडणारा तो असा - हे भगवंता| जे जीव (पुरुष) देवाच्या स्वरूपात जाऊन मिळाल्यावर पुन्हा जन्माला येत नाहीत, ते पूर्वी देवाच्या स्वरूपापासून भिन्न होते की अभिन्न (एकरूप) होते? या प्रश्नाचे उत्तर जे श्रीकृष्णाने दिलं आहे. ते अध्यात्म शास्त्रामधील आत्मज्ञानाचे महत्व अधोरेखित करणार आहे.
भगवंत म्हणतात, ज्ञानदृष्टीने पाहिले तर सर्व जीव भगवंतांशी अभिन्न आहेत. एरव्ही जड-जीवात आणि भगवंतात जो भिन्नपणा वाटतो, तो अज्ञानामुळे होय. त्यामुळे सर्व भूतमात्रांठायी भगवंताचं अस्तित्व संतांनी स्वीकारलेले आहे. तुमच्या-आमच्या ठायीच्या अज्ञानरूपी अंधःकारामुळे सर्वांभूतींचं चैतन्य आम्हाला साम्य पातळीवरून पाहता येत नाही. जन्म आणि मरण यामध्ये मानवाने निर्माण केलेल धर्म-सांप्रदाय-जात-कुळ-प्रांत-भाषा-रीती-रिवाज-मान-सन्मान-प्रतिष्ठा यांचे भेद हे मानीव आहेत. निसर्गाने हे निर्माण केलेलं नाही. स्वत:च्या स्वार्थी स्वभावापायी मानवाने निर्माण केलेले हे अडथळे त्याच्याच दुःखास कारणीभूत ठरत आहेत. म्हणूनच माऊलींनी-विश्वस्वधर्माची घोषणा केली. ईश्वर आणि माया यांच अस्तित्व ज्ञानामुळे निदर्शनास येते.
शंभर नंबरी सोन्यात किडाळ मिसळल्यावर ते जसे कसास कमी उतरते; त्याप्रमाणे परिशुद्ध असा परमेश्वर मायेने परिवेष्टीत होतो. त्यावेळी भगवंतच जीव व ईश्वर भावाने प्रगट होतो. भगवंत हा शुद्ध आणि सात्विक पाहायचा असेल, तर तो आत्मज्ञानानेच पाहावा लागेल.
रामकृष्णहरी