

कृष्णा जाधव (मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई)
शुद्ध ब्रम्हाच्या ठिकाणी ‘जगद्कारणाचा कंद’ येण्यास कारणीभूत ठरणार्या तत्वाला ‘बीजभाव’ संबोधले जाते. मायेच्या निर्मिती मागे उभा असलेला हा बीजभाव हे अश्वत्थ वृक्षाचे पहिले-वहिले उगमस्थान, उपनिषदामधील या बीजभावाचे वर्णन या ठिकाणी माऊलींनी थोडक्यात वर्णिले आहे. सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती त्यावरून सुषुप्त म्हणजे बीज, अंकुर म्हणजे स्वप्न आणि जागृत म्हणजे ‘फल’ अशी वेदांत चर्चा आपण गतलेखात केली. आत्म्याचा मायेशी असलेला संबंध, यातून ‘देहरूपाने’ झालेला अंकुर हे पहिले पान होय. त्यापुढे चिद्वृत्ती हे महत्त्त्व आकाराला येऊ न, त्यापुढे रज-तम-सत्वही तीन फांद्या फुटतात. यापुढील माहिती आजच्या लेखांत -
॥ श्री ॥
अश्वत्थ वृक्षाचे जे खोड आहे त्यास महतत्त्व संबोधले जाते. या खोडापासून फुटणार्या तीन फांद्या याच जीवनाला आकार देणार्या असतात. हा अश्वत्थरूपी जीवनवृक्ष याच फांद्यांसह विस्तार पावायला सुरुवात करतो रज-तम-सत्व गुणांनी युक्त अशा फांद्यांशीद् निगडीत इंद्रिये आणि इंद्रियांशी निगडीत पंचमहाभूतांवर माऊली अत्यंत सटिक व्यक्त होत आहेत, त्यामुळे वाचकांना नम्रपणे अवधान देण्याची विनंती करतो. महतत्वांपासून फुटलेल्या या तीन गुणांना गुणअहंकार असे संबोधले जाते.
1) सात्विक अहंकार :- अक्षय वृक्षाच्या महत्त्तत्व खोडातून बाहेर पडलेली ही अत्यंत महत्वाची शाखा सात्विक अहंकारातून देहामध्ये प्रथम ‘बुद्धीरूप’ पालवी उमलते. जन्माला आलेल्या बालकाच्या शरीरामध्ये पहिले डोकावणारे हे अत्यंत सुंदर बुद्धीरूप पान बुद्धीमधून भेदभावांची निर्मिती व वृद्धी होते. त्यामुळेच लहान मुलं आपले कोण व परके कोण हे समजून (भेद करून) आपल्या जवळच्या माणसाकडे धाव घेते. बुद्धीरूपी पानाचे जस-जसे वयोमानानुसार विस्तारीकरण होते, तेव्हा या पानाची जी डहाळी निर्माण होते त्याच्या विस्ताराप्रमाणे भेदभावांच्या निर्मिती व वृद्धी या दोन्ही क्रिया वाढत जातात. यांचा विस्तार हा स्वतः पासून सुरू होवोन तो आई-वडील कुटुंब-नातेवाईक, समाज, गाव, शाळा इ. याची यादी न संपणारी किंबहुना विस्तारत जाणारी (सातत्यपूर्ण) आहेच आहे.
बुद्धीच्या ठिकाणी ‘विकल्परुपी’ रसाच्या योगाने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या कोवळ्या डहाळ्या डोलू लागतात. यांचा प्रत्येकाचा देहामध्ये अगदी क्षणाक्षणाला अविरत, सतत विस्तार होत असतो हे वेगळे सांगायलाच नको.
कारण याचा आपण सातत्यपूर्ण अनुभव घेत असतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही चार इंद्रिये जीवाला (भूतलावरी सर्व) स्वस्थ बसू देत नाही. प्रत्येकांचे स्वतःचे विविध इच्छा, आकांक्षा, ध्येय आणि उदिष्ट, अगदी त्याचप्रमाणे विषयही.
जगामधील अनंत विषय यांना वेळोवेळी क्षणाक्षणांना आवडतात आणि त्या विषयांच्या प्रतीपूर्ततेसाठी मग जीवाला रात्रंदिवस धावायला लागते. स्वस्थ बसू न देणे हेच या चारही आंतरेंद्रियांच एकमेव उदिष्ट असावे. म्हणूनच तुम्ही-आम्ही आजन्म या आंतरेंद्रियाच्या तालावर नाचत रहातो अगदी जीवनाच्या अंतापर्यंत. या चार आंतरेंद्रियांना ‘सात्विक अहंकार’ म्हणतात.
2) तामस अहंकार :- जीवाचं शरीर तयार होण्याची सुरुवात आहे ती तामस अहंकारापासून होते. पृथ्वी, पाणी, तेज (प्रकाश), वायू आणि आकाश या पंचतत्वांच्या संयोगातून ‘देह’ प्रत्येक जीव धारण करतो, अश्वत्थ वृक्षाच्या या फांद्यांना तामस अहंकार म्हणतात. या पाच स्वतंत्र डहाळ्या.
3) राजस अहंकार - राजस अहंकाराच्या शाखेस पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रियाची पालवी फुटत दहा स्वतंत्र शाखा बहरून येतात, या प्रत्येक शाखेच आणखी एक अत्यंत सूक्ष्म वैशिष्ट्ये माऊली शोधून काढतात. एक ज्ञानेंद्रिय आणि एक कर्मेंद्रिय यांचं एक समान पंच-तत्वांपैकी एक तत्व आणि एक रूपही असतं.
आता मी प्रत्येकी एक ज्ञानेंद्रिय, एक कर्मेंद्रिय, त्यांच पंचतत्वातील स्वरूप आणि स्वतःच असे एक रूप किंवा वैशिष्ट्ये तुम्हा सर्वांच्या अभ्यासासाठी समोर ठेवतो आहे.
1) गुद (कर्मेंद्रिय); घ्राण (ज्ञानेंद्रिय) पृथ्वी - गंध
2) उपस्थ (कर्मेंद्रिय); जीभ (ज्ञानेंद्रिय) - पाणी - रस
3) पाय (कर्मेंद्रिय); डोळा (ज्ञानेंद्रिय) - तेज - रूप
4) हात (कर्मेंद्रिय); त्वचा (ज्ञानेंद्रिय) - वायु- स्पर्श
5) जीभ (कर्मेंद्रिय), कान (ज्ञानेंद्रिय) -आकाश - शब्द
मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूते यांच्या पंचीकरणाने (ही क्रिया यापूर्वीच्या लेखात मी विस्तृत वर्णिली आहे) इंद्रियांच्या आकांक्षा, आशा, अपेक्षा, इच्छा अधिकाधिक क्षणाक्षणाला विस्तृत होत जातात. रूप-रस-गंध-शब्द-स्पर्श यांचे आपआपले विषय ते मानवी असो किंवा सृष्टीतील इतर कोणताही जीव असो त्यावर लादले जातात. या अष्टदा प्रकृतीमुळे अश्वत्थ वृक्ष बहरून येतो. इच्छा-अपेक्षांच्या क्षणाक्षणाला होणारी अनिर्बंध वाढ जीवाला क्षणाक्षणाला आनंद-दुःखांच्या भल्यामोठ्या लाटात ढकलतात. संसार वृक्षाचे स्वरूप असलेला अश्वत्थ वृक्षाचा डोलारा अमाप वाढतो.
किंबहुना इहि आठें। आंगी हा अधिक फाटे।
परि शिंपीचिये येवढें उमटे। रूप जेवी ॥
संसार वृक्षाचं अत्यंत विलोभनीय रूप माऊलींनी तुमच्या-आमच्या समोर ठेवलं आहे. या वृक्षास ‘अश्वत्थ’ म्हणतात. कारण हा प्रपंचरूपी वृक्ष क्षणाक्षणाला बदलत असतो, हा निर्माण होतो, विस्तार पावतो आणि अनेक फांदया क्षणाक्षणाला गळून पडतात. त्यामुळे नष्टही होतो. मानवी देहाविषयी शास्त्रोक्त संशोधन होण्याअगोदर, विज्ञानाने पेशीच्या शोधाबाबत मारलेली झेप, त्याच्या शेकडो वर्ष अगोदर मानवी शरीर क्षणाक्षणाला बदलते एवढेच नव्हे तर जीव (पृथ्वीवरील) मग तो कोणताही असो, विश्व, हे अथांग पसरलेलं ब्रम्हांड हे क्षणाक्षणाला निर्माण-विस्तार-नष्ट पावते आहे, हे माऊली सांगतात. जे की आता विज्ञानानेही मान्य केलेलं आहे.
विज्ञानाने केवळ बाह्य शरीराविषयी मत व्यक्त केले आहे, माऊली अष्टदा-प्रकृती सह निर्माण होणारे विषय यावर भाष्य करतात.यावरून माऊली ठायी असलेली अद्भूत ज्ञान शक्ती प्रत्ययास येते.
तैसीचि ययाची स्थिती।
नासत जाय क्षणांक्षणाप्रती ।
म्हणोनि ययाते म्हणती। अश्वत्थु हा॥
रामकृष्णहरी