Sangameshwar incomplete works pudhari photo
ठाणे

Sangameshwar incomplete works : मुदत संपूनही संगमेश्वर तीर्थक्षेत्रातील ९ कोटी ८२ लाखांची कामे अपूर्ण

सलग दुसऱ्या वर्षी श्रावणात भाविकांची गैरसोय; नियमानुसार कारवाईची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर :ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तीर्थक्षेत्रातील सुमारे ९ कोटी ८२ लाख रुपये खर्चाची तीन विकासकामे सुरू असून, निर्धारित १२ महिन्यांची मुदत संपूनही ती पूर्ण झालेली नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. श्रावण महिन्यात मंदिरात दर्शन व अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांना सलग दुसऱ्या वर्षी गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची भावना ग्रामस्थ व पुरोहितांकडून व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २०२५ मध्ये ही कामे सुरू करण्यात आली होती. तिन्ही कामांसाठी १२ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही कामे अपूर्ण असल्याने संबंधित कामांची कारणे व प्रगती तपासून नियमानुसार आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामांमध्ये विलंब झाल्यास करारातील अटींनुसार दंड आकारावा आणि आवश्यक असल्यास नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करावी, अशीही मागणी आहे.

या दरम्यान आमदार किसन कथोरे यांनी नुकतीच याठिकाणी देवदर्शन केल्याच्या बातम्या समोर आल्या. तर लवकरच ही कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्ग प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुरबाड उपविभागीय अभियंत्यांच्या माहितीनुसार, या कामांना विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा

वैष्णवी कन्स्ट्रक्शनकडून टॉयलेट ब्लॉक, निवारा शेड व सौंदर्यीकरणाचे काम ३ कोटी ८३ लाख १ हजार ६४४ रुपये खर्चाने, तर सवानी हेरिटेज कंजर्वेशन प्रा. लि.कडून संगम पर्यटन स्थळाचा विकास २ कोटी २८ लाख ५७ हजार १३३ रुपये आणि संगम तीर्थक्षेत्राचे सौंदर्यीकरण ३ कोटी ७० लाख ७० हजार २८० रुपये खर्चाने करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT