ठाणे: रिक्षाचालकांना मराठी शिकविण्याची मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर आतापर्यंत १ लाख ६५ हजार रिक्षाचालकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ४० हजार अमराठी रिक्षाचालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे.
मात्र अजूनही काही रिक्षा चालक सोशल मीडियावर मराठी शिकणार नाही, असे व्हिडीओ टाकत असून यापुढे मराठी बोलता आले नाही तर आणखी तीन महिन्याची मुदत देऊन संबंधित रिक्षाचालकाचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द करणार मात्र तीन महिन्यानंतरही जर मराठी बोलता आले नाही तर मात्र कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
यासंदर्भात आरटीओ सोबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर एक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. अमराठी रिक्षाचालकांना मराठी बोलता यावे यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साहित्यिक आणि आरटीओ विभाग यांच्या माध्यमातून रिक्षाचालकांना व्यावहारिक मराठीचे धडे देण्यात येत आहेत.
त्याची मुदत आता १७ ऑगस्ट रोजी संपली असून त्यानंतर आता आरटीओ विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मंत्री सरनाईक म्हणाले,प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येणे हा १९८९ पासूनचा नियम आहे.
महाराष्ट्रात राहून व्यवसाय करता मग मराठी अस्मिता जपलीच पाहिजे,अनेक अमराठी रिक्षाचालकांना मराठी बोलता येत नसल्याने प्रवाशांशी वाद होण्याचे प्रकार घडले असून, पोलिसांत तक्रारी आणि एफआयआरही दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना मराठी शिकविण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती, तिची मुदत आता संपली आहे.
यापुढे जर मराठी बोलता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रिक्षाचालकांना सुरुवातीला तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे . मात्र तीन महिन्यातही जर एखाद्या रिक्षाचालकाला मराठी बोलता आले नाही तर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
अभियानात साहित्यिकांनीही सहभाग घेतला असून, ३६ जिल्ह्यांत साहित्यिक शिक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ६५ हजार रिक्षाचालकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ४० हजार अमराठी रिक्षाचालकांनी मराठी शिकली आहे, असा दावा सरनाईक यांनी केला.
कंत्राटदारांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय
कंत्राटदारांचे ८६ हजार कोटी रुपये थकीत असल्याच्या वृत्ताबाबत सरनाईक यांनी सांगितले की, कंत्राटदारांचे आंदोलन सुरू असल्याचे वृत्तपत्रातून वाचले आहे. या प्रश्नात मुख्यमंत्री लक्ष घालतील आणि त्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेतील.