कल्याण-शिळ महामार्गावर निर्माण झाली नवी कचराभूमी ?  pudhari photo
ठाणे

Kalyan Garbage Issue : कल्याण-शिळ महामार्गावर निर्माण झाली नवी कचराभूमी ?

मोकळ्या भूखंडावरील कचऱ्याला गुरुवारी आग

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या रिजन्सी अनंतम कॉम्प्लेक्स परिसरात नव्याने कचराभूमी तयार करण्यात आल्याचे गुरुवारी सकाळी दिसून आले. कुणीही यावे...अन्‌‍ तेथे कचरा टाकून जाळावा...परिणाम जळणाऱ्या कचऱ्यामुळे धुराचे लोट उठून उग्र दर्पाच्या प्रदूषणात वाढ झाल्याने या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना भयंकर त्रास जाणवू लागला.

डोंबिवली जवळच्या रिजन्सी अनंतम्‌‍कॉम्प्लेक्समधील श्री चैतन्य टेक्नोलॉजी स्कूलजवळ एका मोकळ्या भूखंडावर कचऱ्याला गुरूवारी आग लागली. ही आग तात्काळ भडकल्याने परिसरात काळा धूर पसरला होता. हा कचरा कोणत्या प्रकारचा होता हे समजले नाही. तथापी त्यातून काळा धूर येत असल्याने परिसरातील रहिवाशांना त्याचा भयंकर त्रास जाणवू लागला होता.

वर्षा महाडिक, योगिता थोटांगे, आदी महिला पहाटे सायकलिंग करण्यासाठी त्या परिसरात गेल्या असताना त्यांना ही घटना दिसली. सायकलपटू महिलांनी केडीएमसीच्या स्वच्छता निरीक्षकांना फोन करून कळविले असता त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. जेथे कचऱ्याला आग लागली तेथील भूखंडावर भरणी चालू असून हा कचरा कुठल्या प्रकारचा होता हे समजू शकले नाही. मात्र या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे झालेल्या प्रदूषणाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

हे तर नेहमीचे झाले आहे. या परिसरातील काही मोकळ्या भुखंडावर ट्रक भरून कचरा आणून टाकला जातो. बऱ्याचदा हा कचरा जाळण्यात येतो. नेहमीप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणा गायब झालेली असते, असा धक्कादायक आरोप या भागातील सामाजिक कार्यकर्त्या लता अरगडे यांनी केला. तर या परिसरात अशा आगी यापूर्वी अधूनमधून लागत असतात.

केमिकलयुक्त कचरा जाळल्याने त्यातून भयंकर प्रदूषण निर्माण होत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले आहे. अशा आगीच्या घटनांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांसह सायकल सखी ग्रुपच्या महिलांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT