Prem Bhati Accident Pudhari
ठाणे

Prem Bhati Accident: लोकप्रिय रील स्टार प्रेम भाटी काळाच्या पडद्याआड

दरम्यान, रस्त्यावर पडून असलेल्या खडीमुळे हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप रिक्षा युनियनने केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: कल्याणजवळील मोहने परिसरातील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सोशल मीडियावर लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या प्रेम भाटी यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, रस्त्यावर पडून असलेल्या खडीमुळे हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप रिक्षा युनियनने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १३) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास प्रेम भाटी दुचाकीवरून मोहने परिसरातून आपल्या घरी परतत होते.

यावेळी रस्त्यावर पडलेल्या खडीवर दुचाकी घसरल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते जोरात रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रेम भाटी यांचे वडील कमल भाटी यांचे हेअर स्टाइलिंगचे दुकान असून प्रेम सोशल मीडियावरील रील्समुळे विशेष लोकप्रिय झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवार आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अपघातस्थळ मोहने शिवसेना शाखेजवळ असून तेथे सुरू असलेल्या विकासकामासाठी लागणारे साहित्य आणि खडी रस्त्यावर विखुरलेली होती, असा आरोप रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे. ही खडी वेळेत हटविण्यात आली असती तर हा जीवघेणा अपघात टळला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधित महापालिका अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिक्षा युनियनने केली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT