त्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी pudhari photo
ठाणे

Dev Bhairi temple : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

कालभैरव हे खरं तर ग्रामदैवत म्हणून गावागावांत पुजलं जातं. त्याची मंदिरं गावाच्या वेशीपाशी स्वतंत्र किंवा जोगेश्वरी देवीच्या मंदिराबरोबर असते. रत्नागिरीत खुद्द गावाच्या वेशीवर असंच एक प्राचीन भैरव मंदिर आहे. रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत समजलं जाणाऱ्या श्री देव भैरीचा गावावर जागता पहारा आहे अशी त्याची ओळख आहे.

रत्नागिरीच्या खालच्या आळीत सुमारे 350 वर्षांपूर्वीचे श्रीदेव भैरी हे रत्नागिरीच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. हे मंदिर राजस्थानातील गुजरांनी बांधले असावे, असे काही जाणकार सांगतात. 1731 च्या सुमारास कान्होजी आंग्रेंचा मुलगा सेखोजी आरामारासह रत्नागिरीत आला. त्याच्याबरोबर पाच गुजर नामक कुटुंबे होती. यांनीच शहरात ही मंदिरे उभारली असं मानलं जातं.

मंदिर बाहेरून पाहताना आपल्याला खांबांवरून त्याच्या प्राचीनत्वाची खूण पटते. मूळ मंदिर जरी तृणबिन्दुकेश्वर व जम्बुकेश्वर महादेवाचे असले तरी अधिक बोलबाला कालभैरवाचाच आहे. प्रथम तृणबिंदुकेश्वर आणि अन्य पाच मंदिरांचे दर्शन करून मगच भैरीचे दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे. मंदिरात शिरताच मुखमंडपात उजव्या बाजूस काळभैरवाची स्थापना केलेली दिसते. भैरवाच्या शेजारी त्रिमुखी देवीचंही शिल्प आहे.

मुख्य मंदिरात इतर कोकणातल्या मंदिरांप्रमाणेच गाभारा मंडपातच पण स्वतंत्र छोटेखानी बांधलेला आहे. त्यावर शिखरही घुमटीसारखे आहे. गाभाऱ्याबाहेर देवकोष्ठात गणपती आहे. हे शिव पंचायतन मंदिर असून सूर्य, देवी, विष्णू, गणपती यांचीही छोटी मंदिरे दिसतात. सूर्याची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूर्य ध्यानस्थ बसलेला असून सोबत त्याचा सारथी अरुण व सात मुखे असलेला घोडा आहे. आता मंदिराची बाहेरची भिंत संगमरवरी केली असली तरी आतले लाकडी खांब 300 वर्षे जुने आहेत पण मूळ मंदिर त्याही आधीचे असावे असं ग्रामस्थांचे मत आहे.

मंदिराची रचना काहीशी निराळी आहे. प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असलं तरी भैरवमूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरात शिरताच मंडपातच डाव्या हाताला कालभैरवाची काळ्या पाषाणातली मूर्ती स्थापन केलेली दिसते. मंदिरातल्या व बाहेरही बहुतेक सर्व मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेल्या आहेत.इतर काही देवतांची मंदिरेही या परिसरात बघायला मिळतात. देवी हरितालिकेचं छोटेखानी मंदिरही या परिसरात आहे. दक्षिणाभिमुख हनुमानाचे एक मंदिर असून हा चपेटदान प्रकारचा हनुमान आहे.

यात हनुमान उभा असून त्याचा एक हात उगारलेला आणि दुसरा कमरेवर आहे, पुच्छ मागून पुढे असे वक्राकार फिरलेले दिसते.भैरी देवस्थानचा सर्व परिसर वेगवेगळ्या सुशोभित झाडांनी तसेच जुन्या डेरेदार वृक्षांनी वेढलेला आहे. मंदिराच्या आवारात दोन मोठ्या पुष्करणी आहेत. त्यांच्या सुंदर रचनात्मक बांधणी असलेल्या पायऱ्या मंदिराच्या किमान पाचशे वर्षे जुन्या आहेत. या मंदिराला लाभलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे रत्नागिरी शहराच्या 12 वाड्याच नाहीत, तर शहरात प्रथम प्रवेश करणारा प्रत्येकजण इथे नतमस्तक होतोच. येथील लोकांची श्रीदेव भैरीवर अफाट श्रद्धा आहे. भैरीबुवाचे लक्ष अख्या रत्नागिरीवर तसेच बारवाड्यावर असून, प्रत्येकाच्या हाकेला तो धावून येतो अशी सर्व कोकणवासियांची ठाम श्रद्धा आहे.

या मंदिरात वर्षभर विविध सण जल्लोषात साजरे होत असले, तरी शिमगोत्सवात, फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसर रत्नागिरीकरांनी भरून गेलेला असतो. संपूर्ण कोकणातल्या शिमगोत्सवात श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव मोठा समजला जातो. देव भैरीचा शिमगोत्सव, पालखी खेळवणे, मिरवणूक, गावप्रदक्षिणा, नाक्या नाक्यावर पालखीच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले भाविक, वर्षातून एकदा देव आपल्या घरी येणार ही कल्पनाच खूप आल्हाददायी असते. वर्षातून एकदा फाक पंचमीला श्री देव भैरी आपली बायको देवी जुगाईची भेट घ्यायला तिच्या मंदिरात जातो. तेव्हा त्यांच्या भेटी दरम्यान काही तासांसाठी मंदिरातील दिवेही मालविले जातात. तिथे काही तास वास्तव्य करून भैरी आपल्या पुढील ग्रामप्रदक्षिणेला निघतो.

रंगपंचमीच्या दिवशी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजता सहाणेवरून उठते. कोकणामध्ये ही एक आगळीवेगळी परंतु अगदी ब्रिटिश काळापासून सुरू असलेली ही परंपरा आहे. रंगपंचमी खेळायला भैरीची पालखी गावातून निघताना 4 सशस्त्र पोलीस कर्मचारी सलामी घेऊन भैरीला मानवंदना देतात. ही मानवंदना स्वीकारून पालखी खेळवायला सुरुवात होते. हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे अशा हाका घालत ढोल-ताशांच्या गजरात व हजारो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव कायम उत्साहात साजरा केला जातो.

गावागावातील पालख्यांच्या भेटी, पालखी नाचविण्याच्या पद्धती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. रत्नागिरी शहरासह नजीक परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या वर्षातून एकदा वाजत गाजत श्रीदेव भैरीच्या भेटीला येतात.पालख्यांची भेट भैरी मंदिराच्या आवारातील मिऱ्या गावात होते. भैरीच्या आवारात होणारी ही देवांची भेट अंगावर रोमांच आणणारी असते. भेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचवतात. इथूनच ग्रामदेवता ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. पारंपरिक निशाण अबदागीर यांसह पालखी वाड्या-वस्त्यांमध्ये फिरते. बारा वाड्यातील 22 जातीजमातींचे लोक उत्सव एकत्र येऊन साजरा करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT