गणेशरम्य हेदवी

Hedvi Konkan tourism
गणेशरम्य हेदवीpudhari photo
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

गुहागरच्या दक्षिणेला वेळणेश्वराला उजवीकडे समुद्राच्या काठानेच जात राहिलं की हेदवीचा गर्द झाडीचा रम्य परिसर लागतो. कोकण तसंही नारळीपोफळी, सुपारीच्या बागा आणि आंबा-फणसाच्या घमघमाटाने समृद्ध आहेच. गाव तसं नीटनेटकं, आटोपशीर. हेदवी रम्य तसेच धार्मिकहीआहे. पूजेच्या फुलांनी गावाला जात्याच एक आध्यात्मिक बैठक लाभलेली गावात शिरताच जाणवते. गाव मुळात लहान, त्यात मंदिरं दोन-तीनच पण सगळं कसं वैशिष्ट्यपूर्ण, दखल- पात्र. गावात लक्ष्मी नारायण, ग्रामदेवता नवलाई, उमा-महेश्वर ही देवळं आहेतच, पण अधिक प्रसिद्ध पावलं ते दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर.

महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखीच कोकणातही काही जागृत गणेशाची मंदिरे आहेत, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर.

गावाला निसर्गतः काहीशी उंच-सखल भूमी लाभली असल्याने त्याचे टप्पे पडले आहेत. दशभुज मंदिर थोडंसं टेकाडावर स्थित असून काही पायऱ्या चढून जावे लागते. या दशभुज गणेशाचे गावात आगमन कसे झाले, याबद्दल एक आख्यायिका आहे, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त इथे राहत होते. त्यांनी पेशव्यांची पुण्याला जाऊन भेट घेतली.

Hedvi Konkan tourism
Mehkar Ancient Temples History: आटपाट नगर मेहकर : प्राचीन मंदिर स्थापत्य आणि इतिहासाचा जिवंत खजिना

केळकर स्वामींनी पेशव्यांसंबंधी वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्याने पेशव्यांनी त्यांना मंदिर उभारणीसाठी त्याकाळी निधी मंजूर केला. त्या निधीतून केळकर स्वामींनी येथे हे मंदिर उभारले. केळकर स्वामींच्या पादुकाही मंदिरात आहेत. सदर मंदिर तटबंदीयुक्त आहे.

मंदिर परिसरात एक दीपमाळ आहे. कैलासपतीसारख्या सुवासिक फुलांनी मंदिर परिसर सुगंधी केला आहे. मंदिरातील मुख्य गणेशमूर्ती काश्मीर- मधील पांढऱ्या पाषाणातून घडवली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजूच्या पांच हातांत अनुक्रमे चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा व महाळुंग आहे. डाव्या बाजूच्या हातांत अनुक्रमे कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची लोंब आहे. गणेशमूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेत अमृतकुंभ धरलेला आहे.

मूर्ती मोठ्या आसनावर विराजमान असून साडेतीन फूट उंच आहे. या मूर्तीच्या गळ्याभोवती नाग धारण केलेला आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. म्हणून या मूर्तीला लक्ष्मी-गणेश संबोधले जाते. हे ‌‘लक्ष्मी-गणेश मंदिर‌’ केवळ प्राचीनच नव्हे, तर दुर्मीळही आहे. गळ्यात नागाचे यज्ञोपवीत परिधान केलेली ही दशभुजा गणेशमूर्ती फक्त नेपाळमध्ये पाहायलास मिळते, असे म्हटले जाते.

Hedvi Konkan tourism
Patit Pavan Mandir Ratnagiri History: पतित पावन मंदिर : सामाजिक समतेचा रत्नागिरीतील क्रांतिकारी दीपस्तंभ

पेशवेकाळात अशा मूर्ती मोजक्याच निर्मिल्या गेल्या. मंदिराच्या उजवीकडील लक्ष्मी-विष्णूची मूर्ती ही विशेष रूपातील आहे. मूर्तीच्या बाजूला जय-विजय द्वारपाल असून मूर्ती गरुडारूढ आहे. टप्प्याटप्प्याने जीर्णोद्धार केलेल्या या मंदिरात इ.स. 1956 पासून 3 दिवस माघी व भाद्रपद गणेशोत्सव साजरा केला जातो. जवळच गावातलं लक्ष्मी नारायण मंदिर देखणं आहे.

यातील मूर्ती पांढऱ्या पाषाणात कोरलेली आढळते. गावात एक पेशवेकालीन अरुंद बारवही सापडते. ग्रामदेवतेच्या म्हणजे नवलाईच्या देवळात झोलाई, पावणाई, सिद्धेश्वर, मानाई, विठ्ठलाई, चिनकोबा आदी स्थानिक देवताही स्थापलेल्या दिसतात. तर हेदवीला समुद्रकिनाराही लाभला आहे. पण, तो गणपतीपुळे-प्रमाणेच खडकाळ असल्याने पोहायला तितकासा सुरक्षित नाही. त्याजवळ समुद्राच्या लाटांमुळे खडकांची झीज होऊन, काळ्या पाषाणांच्या पट्ट्यात सुमारे 20 फूट खोल आणि 1-2 फूट रुंद अशी एक नैसर्गिक घळ तयार झालेली दिसते. ती म्हणजे ब्राह्मणघळ.

या घळीतून पाण्याचा एक स्तंभ खडकांवर 20 ते 30 फुटांपर्यंत उसळतो. ते दृश्य मनोहर दिसते. किनाऱ्या- जवळ जाताना वाटेत लागतं ते उमा-महेश्वर मंदिर. त्याच्या गाभाऱ्यात एक शिवलिंग असून मंदिराजवळच एक गोड्या पाण्याचे कुंड आहे. एकूणच हेदवी परिसराला नैसर्गिक, सांस्कृतिक, पुरातत्वीय, ऐतिहासिक, आध्यात्मिक पुष्टी मिळाली आहे. हेदवीशेजारची वेळणेश्वर, व्याघ्राम्बरी देवीचं नरवण, प्राचीन शिव मंदिराचं सुरल, गोपाळ कृष्ण गोखल्यांचे कोतळूक, विजयगड असलेलं तवसळ, अतिप्राचीन सुसरोंडी ही गावं म्हणजे त्याचा पुरावा आहेत.

नयनरम्य वेळणेश्वर, समुद्रकिनारा हे हेदवीचं सख्खे शेजारपण. नरवण गाव हेदवीहून लहानसं पण गावात शिरताना त्याचं नेटकेपण डोळ्यात भरतं. तटबंदीयुक्त जांभ्या दगडातली देवळं, त्यांच्या समोरचे स्वच्छ तलाव कचराविरहित रस्ते यामुळे तेही नजरेत साठतात. पुढे उत्तरेस पालशेतचं प्राचीन बंदर व सुसरोंडीची पुराश्म- युगीन गुहा हे हेदवीचं पुरातत्वीय सान्निध्य आहे. सुसरोंडीची ती गुहा किमान 90 हजार वर्षे जुनी असावी असं संशोधकांचं मत आहे.

एका ग्रीक खलाश्याने पहिल्या शतकात लिहिलेल्या ‌‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी‌’ सारख्या प्रवासवर्णनपर पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‌‘पालमपट्टई‌’ असे म्हटले आहे, ज्याचा निर्देश पालशेतकडे जातो. दुसऱ्या शतकापासून 16 व्या शतकापर्यंत या भागात पालमपट्टई नावाचे बंदर होते. पुढे गाळ साचून ते निकामी झाले असावे आणि काळाच्या पडद्याआड गेले असावे असा संशोधकांचा होरा आहे. त्या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतकाच्या दरम्यान चालत होता. मुख्य म्हणजे हे सगळं हेदवीच्या आजूबाजूलाच घडत होतं. म्हणजे तेही तितकं जुनं आहेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news