डोंबिवली: २०१९ ला जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेत नाहीत, तोपर्यंत सर्व निवडणुकांवर बहिष्कार! ही राज ठाकरे यांची भूमिका सर्व विरोधी पक्षांनी मान्य केली असती तर आजची परिस्थिती वेगळी असती, असा घणाघाती टोला मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे. प्रसार माध्यमांवरील एका चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी एक्स पोस्टवर भन्नाट ट्विट करून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
राजकीय विश्लेषकांना आता राज ठाकरे यांच्या भूमिकेची आठवण होत असल्याचे सांगत राजू पाटील यांनी पुढील धोक्याकडेही लक्ष वेधले. यापुढे SIR च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले मतदार वगळले जातील. जसे की बंगालमध्ये २७ लाख मतदारांबद्दल निर्णय घेतला गेला नाही.
अशा वेळी निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन पण सत्ताधारीच जिंकणार! तुमचे मतदारच जर वगळले तर मतदान होणार कसे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांच्या या कडक प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बॅलेट पेपर विरूद्ध ईव्हीएम आणि मतदार याद्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २०१९ ला राज ठाकरेंचे ऐकले असते तर आजची वेळ आली नसती, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या तत्कालीन भूमिकेवर बोट ठेवले आहे.
राज ठाकरेंची भूमिका आणि सद्यस्थिती
२०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी लावून धरली होती. तेव्हा विरोधी पक्षांनी त्यांच्या भूमिकेला फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र आता SIR म्हणजेच Special Intensive Revision च्या नावाखाली मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
याचाच संदर्भ देत राजू पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये २७ लाख मतदारांबाबत निर्णयच झाला नाही. उद्या तुमच्या-आमच्या भागातही विरोधातील मतदार SIR च्या माध्यमातून वगळले तर लोकशाही कशी शिल्लक राहणार ? मग बॅलेट असो वा ईव्हीएम, निकाल सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने लागणार, अशी भिती राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.