Rajapur historical documents Pudhari
ठाणे

Rajapur historical documents: राजापूरच्या इतिहासात ४०० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ दस्तऐवजांची भर; मोडी लिपीतील कागदपत्रांतून नवा इतिहास उजेडात

रामचंद्रपंत अमात्यांचा पत्रव्यवहार, वतनहक्कांच्या नोंदींचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राजापूरच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भर घालणारा एक दुर्मिळ दस्तऐवजसंग्रह प्रकाशात आला आहे. ४०० वर्षांपूर्वीच्या सापडलेल्या ऐतिहासिक दस्तावेजामुळे दक्षिण कोकणाच्या मध्ययुगीन इतिहासाचे नवे पान उजेडात आले आहे.

राजापूरमधील नाईक-सरदेसाई घराण्याशी संबंधित इ.स. १६६८ ते १७६५-६६ या कालखंडातील ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध झाली असून, त्यातून सुमारे ३०० ते ३५० वर्षांपूर्वीच्या दक्षिण कोकणातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर नवा प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या दस्तऐवजांमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे आज्ञापत्र, रामचंद्रपंत अमात्य यांचा पत्रव्यवहार, जमीनवाटपाचे कौलनामे, वतनहक्कांचे वाद तसेच दत्तकविधानाद्वारे वतनाचा वारस निश्चित करण्यासंबंधीच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे राजापूरसह प्रभावळी, दाभोळ, संगमेश्वर आणि विजयदुर्ग परिसराच्या मध्ययुगीन इतिहासाच्या संशोधनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

राजापूर तालुक्यातील डोंगर येथील दीपक शेलार यांनी ही दुर्मिळ कागदपत्रे मंदिर व इतिहास अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार विनोद पवार यांच्याकडे संशोधनासाठी उपलब्ध करून दिली. या दस्तवेजांमधील मोडी लिपीतील मजकुराचे वाचन नाशिक येथील शासनमान्य मोडी लिपी वाचक रामनाथ रावळ यांनी केले आहे.

या दस्तऐवजसंग्रहातून जमीन महसूल व्यवस्था, वतनदारांचे अधिकार, सरदेशमुखीच्या हक्कांवरील संघर्ष, आणि वारसाहक्क निश्चित करण्याची पद्धत यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा अभ्यास करता येणार आहे.

जमीन महसूल, बागायती विकासाचे धोरण स्पष्ट

या संग्रहातील सर्वांत जुना उपलब्ध संदर्भ इ.स. १६६८ मधील आहे. नरसोवा नाईक सरदेसाई यांना देण्यात आलेल्या कौलनाम्यात तत्कालीन जमीन महसूल व्यवस्था आणि कृषी विकासासंबंधीच्या धोरणाचे चित्र स्पष्ट होते.

पडिक जमिनी लागवडीखाली आणणे, नारळाच्या बागा विकसित करणे आणि ठरावीक कालावधीनंतर महसूल भरणे यांसारख्या अटींचा त्यात उल्लेख आहे. या नोंदींवरून कोकणातील शेतीचा विस्तार, बागायती विकासाला दिले जाणारे प्रोत्साहन आणि महसूल वसुलीची पद्धत यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

या संग्रहातील आणखी एक महत्त्वाचा भाग इ.स. १७६५-६६ च्या सुमारास घडलेल्या वारसाहक्काच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. नरसोवा नाईक सरदेसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांना पुत्रसंतान नसल्याने त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांनी रामाजी नाईक यांना दत्तक घेतल्याची नोंद या कागदपत्रांत आढळते.

खोतीव्यवस्था, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी

या दस्तऐवजसंग्रहात मौजे डोंगर येथील खोतीव्यवस्था, बागांचे उत्पन्न, थकबाकी आणि तब्बल दोन हजार रुपयांच्या देवाणघेवाणीचे हिशेब यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर वेठबेगार आणि फारफर्मास यांसारख्या तत्कालीन आर्थिक व सामाजिक व्यवस्थांशी संबंधित संज्ञांचे उल्लेख आढळतात. या नोंदींच्या आधारे त्या काळातील आर्थिक व्यवहार, महसुली जबाबदाऱ्या, श्रमव्यवस्था आणि स्थानिक समाजजीवनाचे स्वरूप समजून घेण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT