डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या एका कॅफेत राज ठाकरेंविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयाने राज सैनिकांची कुणकुण लागताच आपला गाशा गुंडाळल्याची घटना समोर आली आहे.
सद्या गणेशोत्सव असल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. वाद चिघळू नये यासाठी मनसेचे विधानसभा सचिव अरुण जांभळे, शहर संघटक हरिश पाटील, विभागाध्यक्ष संजय चव्हाण, रक्षीत गायकर, विभाग सचिव अजय घोरपडे उपविभागाध्यक्ष अनिल दाभाडे यांनी कॅफेत जाऊन तेथील व्यवस्थापकाची कानउघाडणी करत इशाराही दिला. कॅफे व्यवस्थापनाने तत्काळ चूक मान्य केली. या कॅफेमध्ये अनेक मराठी कामगार काम करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे सामंजस्याने या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या या कॅफेतील हा कामगार नेहमीच मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी असंबद्ध आणि बेताल वक्तव्य करत असे. शिवाय तो कॅफेतील मराठी तरुणांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मनसेचे निवासी भागातील विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी संबंधित कॅफेच्या चालकाला मोबाईलवर फोन करून समजावून सांगितले. हा विषय या संभाषणातून संपला होता. त्यानंतरही सदर कॅफेतील या व्यक्तीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले. त्यामुळे मनसेचे विधानसभा सचिव अरुण जांभळे, शहर संघटक हरिश पाटील, विभागाध्यक्ष संजय चव्हाण, रक्षीत गायकर, विभाग सचिव अजय घोरपडे, उपविभागाध्यक्ष अनिल दाभाडे संतप्त झाले.
अतिशय सामंजस्याने समजावून सांगूनही ही व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्याला मनसे पद्धतीने धडा शिकविण्या साठी मनसेचे विधानसभा सचिव अरुण जांभळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅफेत जाऊन मालकाला या व्यक्तीची मुजोरी पाहता आपल्या नेत्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कामगारावर कारवाईचा इशारा दिला.
मनसेचे पदाधिकारी कॅफेमध्ये येत असल्याचे कळताच या व्यक्तीने आपल्यावर कारवाई करण्यात येईल, या भीतीने तेथून पळ काढला. तोपर्यंत पदाधिकारी कॅफेमध्ये धडकले. तसेच विविध प्रश्नांची सरबत्ती केली. जांभळे यांनी कॅफेच्या व्यवस्थापकाला बोलावून घेत सज्जड दम कॅफे व्यवस्थापनाला दिला.