भिवंडी ः सध्या महानगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारासाठी भेटी देत आहेत. अशाच भेटीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेला ‘बॉम्बे ढाब्या’ वर गेली. जेथे अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याचे आपल्या सोबत असलेले ठाणे व पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या लक्षात ही बाब आणून दिली.
त्यांनी दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा प्रमुख परेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह बॉम्बे ढाबा येथे दाखल होत. ढाबा व्यवस्थापकास येथील नाव तत्काळ बदलण्याच्या, येथील विद्युत साईन बोर्ड बंद करण्यास सांगून न थांबता मनसे सैनिकांनी येथील नामफलक फाडून आपला संताप व्यक्त केला आहे.
या आंदोलनात ॲड. सुनील देवरे, मिलिंद तरे, पुरुषोत्तम म्हात्रे, अविष पाटील, कुमार पुजारी, मंगेश म्हात्रे, शुभम घोडके, राकेश पाटील, यश गुळवी सहभागी झाले होते.