ठाणे : सन 2008 मध्ये कल्याण येथे रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय परीक्षार्थींना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी बुधवारी ठाणे न्यायालयात हजर झाले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुरू होती. यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याशी सवाल-जवाब करत प्रकरणाबाबत भूमिका विचारली.
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारले की, “मनसे कार्यकर्त्यांनी लाठी-काठ्या घेऊन उत्तर भारतीय परीक्षार्थींवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याबाबत तुम्हाला काही सांगायचे आहे का?” यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “ही खोटी केस दाखल करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा मी ठाण्यात नव्हतोच, तर नाशिकमध्ये होतो.”
यावेळी न्यायालयाने कथित चिथावणीखोर भाषणाचा मुद्दाही उपस्थित केला. “तुमच्या भाषणामुळे ही घटना घडल्याचे जबाबात नमूद आहे. त्या भाषणाची सीडी मिळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती उपलब्ध झाली नाही,” असे न्यायालयाने नमूद केले. त्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा सांगितले की, “या घटनेला जवळपास 20 वर्षे झाली. त्या काळात मी ठाण्यात नव्हतो.” या प्रकरणात सरकारी पक्षाने युक्तिवाद मांडला, तर राज ठाकरे यांच्या वतीने ॲड. सयाजी नागरे यांनी बाजू मांडली.
सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील तारीख 18 मे निश्चित केली असून त्या दिवशी राज ठाकरे यांची वैयक्तिक उपस्थिती आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात आतापर्यंत 12 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती ॲड. सयाजी नागरे यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता न्यायालयीन प्रक्रिया 313 अन्वये पुढे जाणार आहे. या टप्प्यात साक्षीदारांच्या जबाबांबाबत प्रतिपक्षाला मत मांडण्याची संधी दिली जाते. पुढील सुनावणीत अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता असून त्यानंतर न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.