नाते : किल्ले रायगडावर पुरातत्व विभागाने नोटीस देऊनही रोपे वे कंपनीकडून बेकायदेशीरपणे बांधकामे केली जात आहेत.ती तातडीने पाडली जावीत,अशी जोरदार मागणी रायगड प्राधिकरणाचेअध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. दुर्गराज रायगडवर सुरू असलेल्या विविध संवर्धन कामांबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली. त्याचबरोबर गडावरील अनधिकृत व्यावसायिक बांधकाम व अतिक्रमण यांबाबतही त्यांना माहितीसह सविस्तर निवेदन दिले.
या बैठकीस भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांचेसह भीमा अजमेरा (संचालक, संवर्धन), सुंदर पॉल (संचालक, संवर्धन) व ए एम व्ही सुब्रह्मण्यम (संचालक, स्मारके) हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रोपवे कंपनीकडून गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकामे करण्यात आली आहेत. रायगड विकास प्राधिकरणाने या बांधकामांबाबत पुरातत्त्व विभागाकडे वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. बांधकाम सुरू असताना पुरातत्त्व विभागाने काम थांबवण्याची नोटीस देऊनही ती डावलून काम पूर्ण केले गेले आहे. असे असताना या कंपनीवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला. यास पुरातत्व विभागाचे महासंचालक उत्तर देऊ शकले नाहीत, असे संभाजीराजे यांनी प्रतिपादन केले आहे.
खासगी कंपनीची मुजोरी मोडीत काढण्यासाठी व जनतेला सुरक्षित व किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण मार्फत शासकीय रोपवे उभारणे प्रस्तावित आहे,असे ते म्हणाले.
अन्यथा जागतिक वारसा धोक्यात
अशा प्रकारच्या आधुनिक व अनधिकृत बांधकामामुळे नुकताच रायगडास मिळालेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो, या संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयास महासंचालक सिंह यांनी सहमती दर्शवत केवळ रायगडच नव्हे तर इतर अकरा गडांचाही दर्जा काढला जाऊ शकतो, असा धोकाही व्यक्त केला आहे. भविष्यात अशी अपमानास्पद वेळ आली तर त्यास पूर्णत: रोपवे कंपनी, तिला पाठीशी घालणारे लोक आणि डोळेझाक करणारा पुरातत्व विभाग जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.