

पनवेल : नवी मुंबई बँक तसेच गुगल पे अकाऊंट ब्लॉक झाल्याचे सांगत एका सायबर चोरट्याने ऑनलाइन पद्धतीने तळोजा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाकडून तब्बल 22 लाख 89 हजार रुपये ऑनलाइन उकळल्याची घटना समोर आली आहे.
पवन असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनी त्याच्या नावावर बँकेत ठेवलेली फिक्स डिपॉझिटची संपूर्ण रक्कम या सायबर चोरट्याने लाटली. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार तरुण तळोजा येथे राहतो. गेल्या ऑगस्टमध्ये रविकुमार यादव असे नाव सांगणाऱ्या एका सायबर चोरट्याने या तरुणाशी संपर्क साधून त्याचे बँक अकाऊंट व गुगल पे ब्लॉक झाल्याचे सांगत हे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे असेल तर ओटीपी पाठवावा लागेल, असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या पवनने त्याच्या मोबाईलवर आलेले सर्व ओटीपी रविकुमार याला पाठवले.
या ओटीपींचा गैरवापर करून सायबर चोरट्याने 39 ऑगस्ट रोजी 18 लाख रुपये आणि 1 सप्टेंबर रोजी आणखी 4 लाख 89 हजार रुपये असे एकूण 22 लाख 89 हजार रुपयांचा ऑनलाइन व्यवहार करून रक्कम लंपास केली. ही माहिती पवनला समजल्यावर त्याने ती घरच्यांना सांगितली व त्यानंतर त्याने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरटा रविकुमार यादव याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांचा ओटीपी कोणालाही देऊ नका, अन्यथा तुमचीही अशा प्रकारे फसवणूक होईल, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.