Raigad Beaches Oil Waste Pudhari
ठाणे

Oil Waste: तेल तवंगामुळे सागरी जैवविविधतेला धोका; विविध समुद्रकिनाऱ्यांवर तेलमिश्रित कचरा, तेलाचे थर

तेलाचे अवशेष खडक, झुडपे आणि कांदळवनाला चिकटल्याने सागरी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मान्सूनच्या लाटांसोबत समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्यात आता तेलतवंगाची भर पडली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर तेलमिश्रित कचरा तसेच वाळूमध्ये मिसळलेले तेलाचे थर आढळून येत आहेत. तेलाचे अवशेष खडक, झुडपे आणि कांदळवनाला चिकटल्याने सागरी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

मुंबईजवळील मांडवा, आवास, सासवणे आणि नवगाव या किनाऱ्यांवर तेलतवंगाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. लाटांसोबत किनाऱ्यावर आलेले तेल वाळूमध्ये मिसळून घट्ट थर तयार होत आहेत. अलिबाग तालुक्यातील नागाव, नांदगाव, रेवदंडा, तसेच मुरूडमधील काशिद, आगरदांडा आणि दिवेआगर किनाऱ्यांवरही कमी-अधिक प्रमाणात तेलतवंग आढळून येत आहे.

दरवर्षी मान्सूनमध्ये रायगडच्या किनाऱ्यांवर तेलकट कचरा आढळत असल्याने केवळ किनारा स्वच्छ करून हा प्रश्न सुटणार नाही. समुद्रात तेलकट पदार्थ नेमके कुठून मिसळत आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

मुंबई बंदर परिसरातून किंवा दूरच्या समुद्रातून समुद्राच्या प्रवाहासोबत हा कचरा रायगडच्या किनाऱ्यावर येत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर जमा झालेला तेलकट कचरा उचलणे हा तात्पुरता उपाय ठरू शकतो.

मात्र, समुद्रात तेलकट पदार्थ मिसळण्याचा स्रोत शोधून त्यावर नियंत्रण आणले नाही, तर दरवर्षी मान्सूनमध्ये ही समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावित किनाऱ्यांचे नियमित निरीक्षण, समुद्राच्या पाण्याची तपासणी, तेलतवंगाचे नमुने संकलित करून त्याचा स्रोत निश्चित करणे आणि दोषी घटकांवर कठोर कारवाई करणे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

कांदळवन, जलचरांवर परिणामाची भीती

तेलाचे थर वाळू, खडक आणि कांदळवनावर चिकटल्याने सूक्ष्मजीव, खेकडे, शिंपले, मासे तसेच इतर जलचरांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती आहे. त्याचा परिणाम समुद्रातील अन्नसाखळी आणि भविष्यातील मत्स्यसंपत्तीवरही होऊ शकतो.

डॉ. प्रसाद दाभोळकर यांनीही तेलतवंगामुळे किनारी जैवविविधता आणि अन्नसाखळी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभावित किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून तेलतवंगाचे नमुने तपासावेत, प्रदूषणाचा स्रोत निश्चित करावा व नियमित निरीक्षणाची यंत्रणा उभारण्‍याची मागणी पर्यावरणप्रेमी, मच्छिमारांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT