Women Bike Rally Pudhari
ठाणे

Women Bike Rally: दैनिक पुढारीच्या महिला बाईक रॅलीला ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

गुढीपाडव्याच्या निमित्ताने भगवे फेटे, ढोल-ताशांच्या गजरात महिलांची शिस्तबद्ध रॅली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सळसळता उत्साह, आनंदाचे उधाण एकमेकींच्या साथीने आणि एकमेकींना प्रेरणा देत शिस्तबद्धरीत्या बाईक चालविण्याचा आनंद महिलांनी दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लब यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित भव्य बाईक रॅलीत लुटला.

गुढीपाडव्यानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्याचे दैनिक पुढारीचे हे तिसरे वर्ष आहे. सलग तिसऱ्या वर्षीही या रॅलीला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने रविवारी ठाण्यातील टीप-टॉप प्लाझाचा परिसर भगव्या फेट्यांनी आणि महिलांच्या घोषणांनी दुमदुमत होता. रविवार असूनही केवळ पुढारीच्या या बाईक रॅलीसाठी कुणी मराठमोळ्या शृंगारात, तर कुणी या शृंगाराला आधुनिकतेचा साज देत तर कुणी पांढरा कुर्ता आणि पॅन्टच्या वेशात पण त्याच उत्साहात या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

सकाळी 6 पासूनच नटून-थटून महिला या रॅलीसाठी टीप-टॉप प्लाझा येथे जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नाव नोंदणी, फेटे बांधणी, मैत्रीणींसह सेल्फी अशा अमाप उत्साहात एकमेकींना शुभेच्छा देत रॅलीच्या शुभारंभाची आतुरतेने वाट पाहात होत्या. महिलांच्या या उत्साहाला वीर गर्जना

ढोल-ताशा पथकाची साथ होती. या ढोल-ताशांच्या नादावर महिलांनी काही क्षण तालही धरला. शिवगर्जना आणि जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

सन मराठी वाहिनीवरील तू अनोळखी तरी सोबती मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपुले, कला मंदिर सारीज्‌‍चे अल्पेशभाई आणि भावना चावडा, टीप-टॉप प्लाझाच्या स्मिता शहा, जी. व्ही. एम. लाईफ स्पेसच्या निशित मेहता, शिक्षा मेहता, कोकिळाबेन हॉस्पीटलचे

डॉ. शशिकांत पवार, पी. एन. ज्वेलर्सचे प्रदीप शिंदे, हितेश पाटील, आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे उपव्यवस्थापक जयदीप पै, व्यवस्थापक संतोषी चांदणी, सन मराठी वाहिनीची वितरण प्रतिनिधी संचिता परब, चव महाराष्ट्राची उद्योगाच्या रंजना प्रभूखानोलकर, महिला आयोगाच्या समुपदेशक सुनिता गणगे, दैनिक पुढारीचे नॅशनल हेड व उपाध्यक्ष संजीव कुलकर्णी, जनरल मॅनेजर प्रिया राणे, ठाणे-रायगड, पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, मुंबई युनिटचे मार्केटिंग हेड अमित तळेकर, ठाणे कार्यालयाचे मुख्य वार्ताहर दिलीप शिंदे यांनी रॅलीला झेंडा दाखवला.

गुढीपाडव्याच्या औचित्याने दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी कुणी स्त्री जन्माचे महत्व सांगणारा फलक, कुणी भारतीय तिरंगा, तर कुणी दैनिक पुढारीचा झेंडा घेत या यात्रेत स्त्री शक्तीचा नारा देत बाईक चालवली. टीप-टॉप प्लाझा येथून सुरुवात झालेल्या रॅलीने मुलुंड चेक नाका सर्कल येथे वळसा घेऊ न तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, समता नगर, देवदया नगर, पोखरण रोडपर्यंत धाव घेतली आणि पुन्हा त्याच परतीच्या मार्गावर शिस्तबद्ध बाईक चालवत टीप-टॉप प्लाझा येथे रॅलीचा समारोप झाला. या समारोपनंतर महिलांना रॅली इतकेच होणाऱ्या भव्य बक्षिसांची आतुरता होती. या रॅलीत मुलुंड आणि समता नगरचा हिरकणी ग्रुप, शिवकन्या ग्रुप, वैश्य वाणी समाज ग्रुप, त्रिवेणी, हौशी बायका अशा विविध गटातील महिला हिरीरिने सहभागी झाल्या होत्या.

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासह ‌‘तू अनोळखी तरी सोबती‌’ मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपुले, कला मंदिर सारीज्‌‍चे अल्पेशभाई आणि भावना छेडवा, टीप-टॉप प्लाझाच्या स्मिता शहा, जी. व्ही. एम. लाईफ स्पेसच्या निशित मेहता, शिक्षा मेहता, कोकिळाबेन हॉस्पीटलचे डॉ. शशिकांत पवार, पी. एन.ज्वेलर्सचे प्रदीप शिंदे, हितेश पाटील, आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे उपव्यवस्थापक जयदीप पाल, व्यवस्थापक संतोषी चांदणी, सन मराठी वाहिनीची वितरण प्रतिनिधी संचिता परब, चव महाराष्ट्राची उद्योगाच्या रंजना प्रभूखानोलकर यांनी लकी ड्रॉ मध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना भेट वस्तू प्रदान केल्या.

महापौर शर्मिला पिंपळोलकर म्हणाल्या, आज स्त्रिया सक्षम झाल्या आहेत. चूल-मूल सांभाळून अर्थाजन करत आहेत. अनेकदा महिलांना काही समस्या येतात. नगरसेवक म्हणून काम करताना महिलांपुढील समस्या काय असतात, हे मला माहिती आहे. ग्रामीण भागातील महिलांपुढे अधिक समस्या आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिलांनी आपल्या भागातील समस्या आपल्या भागात कार्यरत असलेल्या नगरसेवकांकडे मांडाव्यात, त्यामुळे त्या-त्या प्रभागातील सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली, मी ठाणेकरच आहे. किसन नगर येथे मी राहात होते. ठाण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभाग घेत असे.

दै. पुढारीच्या कस्तुरी क्लबच्या विविध कार्यक्रमांसाठी अन्य जिल्ह्यात मी जाते.

दै. पुढारीच्या कस्तुरी क्लबमुळे महिलांना घरगुती आयुष्य, नोकरी यापुढे जाऊन चांगले व्यासपीठ मिळते आहे, त्यामुळे महिलांना एक दिवस वेगळे जगण्यासाठी मिळाला, यासाठी पुढारीचे आभार मानायला हवेत, अशा भावना व्यक्त केल्या.

अभिनेता अंबर गणपुले म्हणाला, महिलांचा बाईक रॅलीत उत्साह, त्यांनी केलेली तयारी पाहून आनंद वाटला. महिलांना गाडी चालवता येत नाही, अशी टीका केली जाते, पण आज त्यांनी ज्या पद्धतीने शिस्तबद्धरित्या गाडी चालवली त्याचे कौतुक वाटले. महिला आयोगाच्या समुपदेशक सुनिता गणगे यांनी महिला आयोग महिलांना कशा पद्धतीने भावनिक, कायदेविषयक मदत करते, याची सविस्तर माहिती दिली. आयोगाच्या समुपदेशन केंद्राचे सहाय्यक अविनाश पवार, प्रणय सरदेसाई यांनी आयोगाच्या कार्याची पत्रके देऊ न महिलांना त्याविषयी माहिती दिली. या रॅलीचे आणि लकी ड्रॉ सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन स्वप्नील जाधव यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT