Eknath Shinde File Photo
ठाणे

Eknath Shinde : मुंबई-नाशिक रोडवरील नव्या उड्डाणपूलाच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या मुंबई - नाशिक महामार्गावरील खारेगाव उड्डाणपूल हा तीन दिवसात सुरू होईल तर रखडलेले कशेळी आणि वडपे पुलाचे काम महिनाभरात पूर्ण होईल. मात्र रेल्वेवरील चौथ्या पुलासाठी रेल्वे प्रशासनाकडे ब्लॉक घेतले जाईल. ज्या नवीन बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे तब्बल १६०० पॅनलचे निकृष्ट बांधकाम झाले आहेत, त्या बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून जबाबदार एमएसआरडीसीचे अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावे, असे आदेश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ११) ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत २०२६- २७ या आर्थिक वर्षाच्या १७०० कोटींच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण उपयोजनेसाठी ६६० कोटी, आदिवासी उपयोजना १४० कोटीं आणि अनुसूचित उपयोजनेसाठी १०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आला.

या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, रखडलेली पूल, रस्त्यांची कामे आणि मंजूर जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यास अपयशी झालेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत यापुढे १०० टक्के निधी खर्च करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला. या बैठकीत आमदारांनी वाहतूक कोंडीबाबत तीव्र्र नाराजी व्यक्त दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

आमदार रईस शेख यांनी थेट एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. तेव्हा शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्याची कानउघडणी करीत अनिल गायकवाड यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नामदार शिंदे यांनी वाहुतक कोंडी, रस्त्यावरील पडलेले खड्डे, मेट्रो, आदी प्रकल्पांबाबत संबंधित अधिकऱ्यांबाबत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे मेट्रोची चाचणी घेऊन वडाळा - कासारवडवलीच्या चार किलो मीटरपर्यंत मेट्रो (चार) डिसेंबरमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. ती ठाणे मेट्रो सुरूच होऊ शकली नाही, याबाबत विचारला झाली असता नामदार शिंदे म्हणाले ही मेट्रो वडाळा ते कासारवडवली, भाईंदर पाड्यापर्यंत आहे. या मेट्रोच्या कामाची पाहणी मी स्वतः एमएमआरडीएचे प्रमुख मुखर्जी यांच्यासोबत करेन. त्यासाठी जातीने लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले. बारावीच्या परीक्षेला जाताना डोंबविलीच्या विद्यार्थीचा रेल्वेतून पडून झालेला मृत्यू हा दुर्देवी असून रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक पालिकांमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणार

भटक्या कुत्रांचा मोठ्याप्रमाणावर त्रास होत असून त्याच्या हल्ल्यातून अनेक मुले जखमी झाले आहेत. भिवंडीत एका लहान मुलाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांसाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारण्याच्या सूचना सर्व महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी डॉग व्हॅन घेण्याच्या सूचना नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आल्याचे नामदार शिंदे यांनी सांगितले आहे.

महिला पत्रकारांचा अपमान करणे अयोग्य

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचा आदर आणि सन्मान आहे. रागाच्या भरात पत्रकारांचा अपमान करणे योग्य नाही. असे होता कामा नये. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आल्याच्या रागापोटी ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांनी महिला पत्रकारांचा अपमान केला, ही घटना दुर्दैवी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांच्या कृतीचा समाचार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT