प्रा. सुहास बारटक्के
मासे शेतात रूजतात? समुद्रात सापडतात?की आकाशातून पडतात? सध्या या तिन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी देता येऊ शकतात. एकदा एका गावात चक्क माशांचा पाऊस पडला. ढगातून धरणीवर कोसळलेले चक्क जिवंत मासे. लोक आश्चर्यचकित झाले. (तरी आयते दाराशी आलेले मासे पकडून खाल्लेच.) आणि मग चर्चा सुरू झाली ती हे कसे घडले याची. जेव्हा आभाळ पाण्याने गच्च भरून समुद्राला टेकण्याइतपत खाली येतं तेव्हा काही वेळा निर्माण झालेला चक्रीवादळाचा भोवरा समुद्राचं पाणी घेऊन आकाशाच्या भेटीला येतो.
समुद्राच्या पाण्याचा एक स्तंभ चक्क आकाशातल्या काळ्या ढगांची भेट घेतो आणि समुद्राच्या पृष्ठभागावर फिरणाऱ्या माशांच्या झुंडी समुद्रातून थेट ढगात व तिथून वाऱ्याबरोबर वहात एखाद्या गावात जातात अन् हा ढग फुटतो व तो माशांचा वर्षाव करतो. अशी ही गंमत! पण ही क्वचितच घडते. नित्याचे मासे मात्र समुद्रातच सापडतात. परंतु झालंय असं की मासे खाणारी तोंडं वाढलीत आणि समुद्रातलं माशांचं उत्पादन घटलंय. इतकं की वर्तमानपत्रात दिल्याप्रमाणं येत्या दहा वर्षात माशांचा प्रचंड दुष्काळ होईल व पुढील पिढीला मासे खायला मिळणार नाहीत.
दुर्दैवान ही गोष्ट खरी ठरण्याच्या मार्गावर आहे. सध्या समुद्र ओरबाडून ही सागरी संपत्ती गोळा केली जाते. पर्सनेटसारखी जाळी समुद्राचा तळ अक्षरशः ओरबाडून लहानमोठ्या सगळ्या जलचरांना जाळ्यात पकडतात. त्यातील लहान मासेही बीज म्हणून सोडण्याऐवजी ते टोपल्या भरून विक्रीला पाठवले जातात. परदेशात लहान आकाराचे मासे तत्काळ समुद्रात सोडले जातात. जलचर प्राण्यांबाबतीतले नियम काटेकोरपणे पाळले जातात. आपल्याकडे मात्र माशांची बिजे सर्रास नष्ट केली जात असल्याने उद्या माशांचा दुष्काळ पडणार हे नक्की!
मग यावर उपाय काय? माशांची शेती, कोळंबीची शेती सध्या फार्मात आहे. धरणातूनही माशांची बिजे सोडली जातात आणि साठवलेल्या पाण्यात भरपूर मासे तयार होतात. वेगवेगळ्या जातीच्या माशांची ही बिजे जतन करून त्यांची लागवड (शेती) करण्यासाठी मत्स्यमहाविद्यालये प्रयत्न करीत आहेत. आपणही केवळ खवय्येगिरी न करता अशा उपक्रमाला हातभार लावायला हवा.
पूर्वी रत्नागिरीला बक्कळ प्रमाणात तसरे (मुळे) मिळायचे. हल्ली ते खूपच कमी म्हणजे जवळपास नष्ट झालेत. म्हणून समुद्रकाठच्या लोकांनी राजापुरात जाऊन तसऱ्यांचं बियाणं (लहान तसरे) आणलं त्याची समुद्रकाठी पुळणीत लागवड केली आणि हल्ली त्याचं पुन्हा उत्पादन सुरू झालंय. जेव्हा प्रश्न पोटाचा असतो तेव्हा तळमळीत तो सोडवण्याचा प्रयत्न केला जातो ते असं.
मच्छीमारांनी जसे माशांची बिजे पकडू नयेत तशीच आपणही ती विकत घेऊ नयेत. पण आपल्याकडे सर्रास लहान आकाराचे शार्क मासेही विक्रीला आणले जातात. आपण विकतही घेतो. त्याऐवजी आपण थोडी विक्रेत्यांची कानउघाडणी केली तर? लहान शार्क अथवा तत्सम मासे विक्रीला आणणे हा खरोखरंच गुन्हा आहे, किमान एवढं तरी त्यांना कळू द्या!...म्हणजे कदाचित पुढच्या पिढीला मासे खायला मिळतील!