नणदांनी ढकलल्याने गर्भाशयातील तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू  file photo
ठाणे

Pregnant woman assault case : नणदांनी ढकलल्याने गर्भाशयातील तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

कौटुंबिक हिंसाचाराने गाठले टोक; डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : लग्नात आम्हाला हुंडा दिला नाही, मानपान काही दिले नाही, असा आरोप करत हुंड्यासाठी डोंबिवलीत माहेरी राहणाऱ्या एका महिलेचा पती, दोन नणंदा, सासू, सासरे असे सगळे मिळून छळ करत असत. परळ येथे सासरी राहत असताना लग्नाच्या वाढदिवशी तर या कुटुंबीयांनी हिंसाचाराचा कहरच केला. वेगवेगळ्या कारणांवरून भांडण उकरून काढले. यावेळी दोन्ही नणंदांनी तिच्या वडिलांच्या नावाने शिवीगाळ केली.

दोन्ही नणंदांनी गर्भवती महिलेला ढकलून दिले. पोटावर आपटल्याने या महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्या. एक महिन्यानंतर गर्भवती महिला वैद्यकीय तपासणीसाठी परळच्या वाडिया रूग्णालयात गेली. तेव्हा तेथील डॉक्टरांनी आपल्या गर्भाशयातील तीन महिन्यांचे बाळ एक महिन्यांपूर्वीच मृत झाल्याचे पिडीत महिलेला सांगितले. या सगळ्या प्रकाराने महिलेची मानसिक स्थिती बिघडली.

सासरी छळ होतो म्हणून वडिलांनी परळ येथून आपल्या गर्भवती मुलीला डोंबिवलीत आणले. परळला सासरच्या घरातून बाहेर पडताना सासूने गर्भवती महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि इतर स्त्रीधन काढून घेतले. शिवाय पुन्हा सासरी येऊ नकोस अशी दटावणी केली. पोटात बाळ मृत असल्याने वाडिया रूग्णालयात दाखल होऊन तेथे गर्भवती महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी तक्रारदार महिलेला आपल्या आधारकार्डची गरज होती. मात्र आधारकार्ड परळ येथे सासरी राहिले होते.

पिडीत महिलेने सासरकडील मंडळींशी संपर्क साधून कार्डची मागणी केली. आपणास आधारकार्ड दिले नाही तर पोलिस ठाण्यात तक्रार देऊ, असे सांगितले. आपणास पतीने आधारकार्ड आणून दिले. पोलिसांत तक्रार दिली तर घरात न घेण्याची आणि आधारकार्ड न देण्याची धमकी सासरच्या कुटुंबीयांनी पिडित महिलेला दिली. दोन्ही नणंदांनी शिवीगाळ करत पोटावर ढकलल्याने आपल्या गर्भाशयातील बाळाला दुखापत होऊन ते मृत झाले होते. पोलिसांत तक्रार केल्यास आपणास आधारकार्ड मिळणार नाही या विचाराने आपण दोन नणंदांविरूध्द तक्रार दिली नसल्याचे पिडीत विवाहितेने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे.

लग्नाच्या दुसऱ्या रात्रीपासून पतीने दाखवले रंग

पिडीतेचे वडील पोलिस खात्यातून निवृत्त झाले आहेत. आपल्या मुलीचा विवाह त्यांनी परेल येथील डॉ. एस. एस. राव रोड परिसरातील गृहसंकुलात राहणाऱ्या तरूणाबरोबर एप्रिल 2024 मध्ये करून दिला होता. विवाहासाठी पिडीतेच्या वडिलांनी पाच लाख रूपये खर्च, तसेच मागणीप्रमाणे जावयाला सोन्याचा ऐवज दिला होता. आमचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तो निर्व्यसनी आहे, असे सासरच्या मंडळींनी पिडीतेला लग्नापूर्वी सांगितले होते. तथापी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी पिडीतेचा पती दारू ढोसून घरी आला. त्यानंतर मित्रांबरोबर तो नियमित दारूच्या पार्ट्या झोडू लागला.

हा सगळा प्रकार पिडीतेने सासू, सासरे आणि दोन नणंदांना सांगितला. उलट तुम्ही आम्हाला लग्नात काही दिले नाही. त्यामुळे तुला आता काही बोलायचा अधिकार नाही. तू तुझ्या पतीच्या दारू व्यसनाबद्दल बाहेर काही बोलायचे नाही, अशी याऊलट सासरच्या मंडळींनी पिडीतेला तंबी दिली. त्यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी पैशांसाठी पिडीतेचा छळ सुरू केला. हा छळ पिडीत विवाहितेच्या पोटात वाढणाऱ्या जीवाचा काळ ठरला. आता विष्णूनगर पोलिस या संदर्भात काय कारवाई करतात? याकडे पिडीत विवाहिता आणि तिच्या माहेरच्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तीन लाख आण...तरच घरात पाय ठेव

वाडिया रूग्णालयात गर्भपाताची प्रक्रिया पार पडल्यानंतर महिला आपल्या माहेरी डोंबिवलीत निघून आली. याच दरम्यान एका नणंदेच्या पतीने पिडीत विवाहितेला आपण सासरच्या कुटुंबीयांना समजावून सांगतो. मग आपण घरी या, असे सांगितले. त्यावेळी सासरच्या मंडळींनी नांदायला यायचे असेल तर पहिले तीन लाख रूपये घेऊन ये, असा निरोप दिला. पैशांच्या या सततच्या मागणीमुळे पिडीत विवाहिता हैराण झाली होती. अखेर तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT