ठाणे : राज्यात अनेक नेत्यांनी त्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊन निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतली. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा; अशा आशयाचे भावनिक पत्र त्यांनी शिवसैनिकांना लिहिले आहे.
पूर्वेश सरनाईक हे युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत. ठाणे महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. २०१७ साली ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवण्याची संधी मला मिळाली आणि तुम्ही दिलेल्या प्रचंड बहुमतामुळे ती निवडणूक जिंकलो नाही, तर तो माझ्यासाठी आशीर्वाद ठरला. तुमचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा तसेच आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या अथक परिश्रमांमुळेच मला ठाण्यातील सर्वात तरुण नगरसेवकांपैकी एक नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यासाठी मी तुमचा मनापासून ऋणी आहे. दरवेळी हे गरजेचे नाही की राजाचा मुलगाच राजा बनावा तर कार्यकर्त्याला ही संधी मिळाली तर तो उत्तम शासक बनू शकतो.
मागे घेतलेली दोन पावलं ...
म्हणूनच माझी ही मागे घेतलेली दोन पावलं उद्या शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाला दिशा देणारी ठरतील, अशा अनेक मुद्यांमध्ये पूर्वेश सरनाईक यांनी भावनिक हात घातला. शिवसेनेने मला युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देणे, त्यांना पुढे आणणे आणि जनसेवेची जबाबदारी सोपवणे, हाच शिवसेनेचा खरा आत्मा आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. जरी मी या निवडणुकीत उमेदवार नसलो, तरी प्रभाग क्रमांक १४ मधील जनतेशी असलेली माझी नाळ आणि आपुलकी कायम तशीच राहील, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.