Pratap Sarnaik on Mira Bhayandar Morcha
मीरा-भाईंदर : अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने आज मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावर ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
''पोलिसांची गुंडगिरी सहन करणार नाही. मी स्वतः मीरा भाईंदरला मोर्चात सहभागी होण्यासाठी जात आहे. पोलिसांची हिंमत असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावं,'' असे आव्हान प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर पोलिसांना दिले आहे.
व्यापारी बंधूंनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. काल मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाला परवानगी मागितली होती. त्यांना परवानगी नाकारण्यात आली.काही कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या आहे. पोलिसांनी त्यांना परवानगी द्यायला हवी होती. आज सकाळपासून सुरु असलेल्या गुंडगिरीचा, धरपकडीचा मी निषेध नोंदवतो. ही गुंडगिरी सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाला आहे. आम्हाला पाहायचं आहे की जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मीरा रोडवर घटना घडली. मीरा रोडवरच व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि आम्हाला सांगितले की तुम्ही घोडबंदर रोडवर मोर्चा काढा. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, असे देशपांडे पुढे म्हणाले.
एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मीरा रोड पूर्व येथे जोधपूर स्वीट्स आणि नमकीन हे दुकान असून या दुकानाच्या मालकाला मराठी बोलता येत नाही यावरून मनसेकडून मारहाण करण्यात आली होती. यानंतर मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात बंद पुकारला. त्यांनी मुख्य शहरातून मोर्चाही काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे कार्यकर्ते आणि मराठी एकीकरण समिती आज मोर्चा काढणार होती. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले.