दहिसर टोल नाका वरसावे उड्डाणपुलापुढे स्थलांतरीत करा pudhari photo
ठाणे

Pratap Sarnaik : दहिसर टोल नाका वरसावे उड्डाणपुलापुढे स्थलांतरीत करा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे गडकरींना साकडे

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

मुंबई व मिरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यावर लोकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे हा टोल नाका वरसावे येथील नर्सरीजवळ स्थलांतर करण्याचा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला. त्याला घोडबंदर वासियांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर तो नर्सरी ऐवजी थेट वसई-विरार महापालिका हद्दीतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे उड्डाणपुलाच्या पुढे स्थलांतरीत करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे.

मिरा-भाईंदर शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असून शहरातील वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथील रस्त्यांवर वाहनांची रेलचेल वाढली असतानाच शहरातील नागरिकांना मुंबईला ये-जा करण्यासाठी दहिसर टोल नाका ओलांडावा लागतो. मात्र या दहिसर टोल नाक्यावरून मुंबईकडे जाताना किंवा मुंबई वरून येताना बहुतांशी वाहने येथील वाहतूक कोंडीत अडकून पडतात. यात मोठा वेळ वाया जात असून या वाहतूक कोंडीसह प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.

या टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरिकांची मुक्तता होण्यासाठी सरनाईक यांनी हा टोल नाका मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत असलेल्या वरसावे येथील नर्सरीजवळ स्थलांतर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याला उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर हा टोल नाका दिवाळीपूर्वी स्थलांतरासाठी सरनाईक यांनी अधिकार्‍यांसोबत नर्सरी येथील जागेची पाहणी केली. मात्र या टोलनाक्याला सर्व स्तरातून विरोध केला. त्यातच घोडबंदर वासियांनी हा टोल नाका येथील नर्सरीजवळ स्थलांतर केल्यास बहुतांशी वाहने टोल वाचविण्यासाठी घोडबंदर गावातील रस्त्याचा वापर करतील. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी उद्भवून अपघातात वाढ होण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी या टोल नाक्याच्या वरसावे येथील स्थलांतराला विरोध दर्शविण्यासाठी टोल नाका स्थलांतर संघर्ष समिती स्थापन केली.

घोडबंदरवासीयांना तूर्तास दिलासा

सरनाईक यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांना टोल नाका स्थलांतरासाठी साकडे घातले. यावर गडकरी यांनी दहिसर टोल नाका स्थलांतराला तत्वतः मंजुरी दिल्याचे बोलले जात असून याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने देखील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या संबंधित अधिकारी तथा पदसिद्ध अधिकार्‍यांना पत्रव्यवहार केला आहे. यामुळे घोडबंदरवासियांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

दिवाळीपूर्वी स्थलांतर करण्याचे निर्देश

याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीने 21 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. त्यावर सरनाईक यांनी हा टोल नाका दहिसर टोल नाक्यापासून सुमारे 4 किलो मीटर अंतरावरील वसई-विरार महापालिका हद्दीत असलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे उड्डाणपुलापुढे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक आयोजित टोल नाका स्थलांतर दिवाळीपूर्वी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT