ठाणे : ठाण्याच्या मानपाडा परिसरातील बहुचर्चित प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील पहिल्याच दिवशी अटक केलेला आरोपी प्रकाश उर्फ पप्प्या शिंदे याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी ५ आक्टोबर रोजी संपल्याने सोमवारी त्याला ठाणे न्यायालयात हजार केल्यानंतर पोलीस आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादाने प्रकाश उर्फ पप्प्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत वाढ करीत ९ आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मंगळवारी (ता. २९) रात्री पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी सतीश उर्फ पप्या शिंदे याला अटक केली होती. त्यावेळी त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
कोठडीची मुदत संपल्यानंतर (आज) सोमवारी त्याला न्यायाधीश एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी तपासातील माहिती न्यायालयासमोर मांडली.
पप्या शिंदे याने मारेकऱ्यांना घटनास्थळावरून पसार होण्यासाठी कारची व्यवस्था केल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच त्याने वापरलेला मोबाईल क्रमांक दुसऱ्याच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कॉल डिटेल रेकॉर्डनुसार (सीडीआर) पप्या शिंदे हा इतर आरोपींच्या संपर्कात सुमारे १५० वेळा असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपी, हत्येचा कट आणि पप्या शिंदेची भूमिका याबाबत अधिक तपास करायचा असल्याने पोलिसांनी आणखी नऊ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.