Ulgulan Morcha : ‘उलगुलान’ मुंबईच्या वेशीवर रोखला; सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Tribal Students Protest : दोन ते तीन तास ताटकळत ठेवल्याचा विद्यार्थ्यांचा दावा, पोलिसांनी आरोप फेटाळले
Tribal Students Protest
भिवंडी : प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना भिवंडीतील रांजनोली नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.pudhari photo
Published on: 
Updated on: 

भिवंडी : आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षण, भोजन आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकहुन मुंबईच्या दिशेने निघालेला विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान मोर्चा’ ठाणे हद्दीतील खारेगाव टोलनाक्यावर पोलिसांनी अडविला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत धक्काबुक्की झाल्याने सहा ते सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

प्रकृती अस्वस्थ झालेल्या तीन मुलींसह तीन ते चार विद्यार्थ्यांना रांजनोली नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आरोपांवर भिवंडी पोलिसांनी मात्र विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याचा दावा केला आहे.

Tribal Students Protest
Mumbai Metro Expansion : पुढच्या वर्षी ७० किलोमीटर मेट्रो मार्गिका उभारण्याचे उद्दिष्ट

आश्रमशाळांमधील विविध प्रश्नांवरून सुरू झालेला हा मोर्चा रविवारी सायंकाळी भिवंडीत दाखल झाला होता. भिवंडी बायपास येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आंदोलक विद्यार्थी रात्री विश्रांतीसाठी थांबले होते.

आश्रमशाळांतील प्रश्नांवरून सुरू आहे आंदोलन

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, भोजन आणि सुरक्षेच्या प्रश्नांसह गेल्या दोन वर्षांत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या मृत्यूंसाठी आदिवासी विकास मंत्रालयाला जबाबदार धरत आंदोलकांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गडचिरोली येथे सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, आश्रमशाळांमध्ये जेवण बनविण्याची परवानगी देऊन सेंट्रल किचन बंद करावे, तसेच आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव व संबंधित अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या.

Tribal Students Protest
CEC Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात माजी सनदी अधिकारीही मैदानात

पोलिसांचे म्हणणे काय?

भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भिवंडी पोलिसांनी विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून सहकार्य केले. विद्यार्थ्यांकडे स्वतःचे जेवण असल्याने त्यांनी पोलिसांच्या जेवणाला नकार दिला; त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली. मुंबईतील मोर्चाला परवानगी नसल्याने मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना रांजनोली नाक्यावर आणून सोडले. त्यांना आणताना नेमका काय प्रकार घडला, याची माहिती नसल्याचे बनसोड यांनी सांगितले. मात्र, भिवंडी पोलिसांनी विद्यार्थ्यांना सहकार्यच केल्याचा दावा त्यांनी केला.

आमच्या सोबत धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आम्हाला तीन ते चार तास इकडे-तिकडे फिरवले. त्यामुळे सहा ते सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. पोलिसांनी मदत करण्याऐवजी त्रासच दिला.

वैष्णवी खिल्लार, विद्यार्थिनी

एका पोलिसाने हाताच्या कोपराने छातीत मारल्याने मी बेशुद्ध झालो. कपडे आणि कागदपत्रे मुंबईतच राहिली आहेत. ती घेण्यासाठीही आम्हाला मुंबईला जाऊ दिले जात नाही.

अरुण पावरा, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news