ठाणे : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने राजकीय वातावरण तापले असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी एक ना अनेक तपशील दिल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी पुरवणी एफआयआरमध्ये संशयित आरोपी म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा समावेश केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
ठाण्यातील क्लस्टर योजना, अनधिकृत बांधकाम आणि ड्रग्जविरोधात लढा उभारणारे शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू ) पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयाबाहेर दुचाकींवरून आलेल्या चार आरोपींनी अंधाधुंद गोळ्या झाडल्या. धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली.
याप्रकरणी पाच आरोपींपैकी पप्पू शिंदे याला अटक झाली असून, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी हत्येच्या वेळी पूर्णेकर यांच्या कार्यालयातच बसला होता. अन्य फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ११ पथके रवाना केली आहेत.
पूर्णेकर यांच्या हत्येचा कट मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यासह रचला गेला, असा आरोप करत पूर्णेकर कुटुंबीयांनी शिवसैनिकांसह बुधवारी दिवसभर कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. हत्येचे मुख्य सूत्रधार मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका पूर्णेकर यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी घेतली.
बुधवारी सायंकाळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही पोलीस ठाणे गाठले आणि पूर्णेकर यांचा मुलगा राम , पत्नी, आणि भाऊ जयनाथ पूर्णेकर यांच्यासह ठाणे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी चर्चा केली. मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल केला नाही तर महाराष्टातील शिवसैनिक हे ठाण्यात येतील, आक्रोश वाढेल आणि मग कठीण परिस्थिती होईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
आरोपी मिनाक्षी शिंदेंच्या घरी गेले होते
अखेर पुरवणी एफआयआर दाखल करून त्यामध्ये मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या संशयित आरोपी म्हणून नावाचा समावेश करण्यासाठी पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांचा नव्याने जबाब घेण्यात आला. प्रदीप पुर्णेकरच्या हत्येपूर्वी काय काय घडले, आरोपी मीनाक्षी शिंदे यांच्या घरी आरोपी हे किती वेळा गेले होते, याची माहिती रामने दिली. अखेर मिनाक्षी शिंदे दाम्पत्याचा संशयित आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. त्यांना अटक करून चौकशीची मागणी पोलिसांनी मान्य केल्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीय तयार झाले.
आरोपींना पालकमंत्र्यांचे संरक्षण
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या घरी रचला आणि सर्व आरोपीना त्यांच्या घरी जाताना राम पूर्णेकर यांनी पाहिले, मनोरमा येथील नीलकंठ टॉवरसह संशयित आरोपींचे पुरावे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषेदेत दिली. पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपींना वाचविण्याचे काम दिवसभर सुरु होते. मुख्य सूत्रधार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निटवर्तीय मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना संरक्षण दिले जात असून, पालकमंत्री आरोपींना वाचविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग !
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणीही राऊत यांनी केली. गृहमंत्र्यांनी वेषांतर करून ठाण्यातील कायदा सुव्यस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे हे पाहावे, पोलीस हे शिंदे यांचे घरगडी झाले आहेत. महिनाभरात ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासह पाच हत्या झाल्या आहेत. पालकमंत्री हे गुंडांची टोळी पाळत असून हत्येपूर्वी आरोपींची बैठक मीनाक्षी शिंदे यांच्या घरी झाली होती . त्या आरोपींना त्यांच्या घरी जाताना अनेकदा पाहण्यात आले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असून मिनाक्षी शिंदे दाम्पत्याला अटक करून चौकशीची मागणी राऊत यांनी केली. उद्यापासून शिवसैनिक हे पोलीस ठाण्याबाहेर थांबून कारवाईबाबत विचारणा करणार असल्याचे राऊत म्हणाले.