प्रदीप पूर्णेकर याच्या हत्येनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलेला होता. ऍम्ब्युलन्स मधून आल्यानंतर नागरीकांसह समर्थकांनी कापुरबावडी पोलीस ठाण्याला घेराव घालण्याठी उसळलेली गर्दी pudhari photo
ठाणे

Pradeep Purnekar death case: ठाण्यात राजकीय रक्तपात!

मित्रच घातकी ठरला; पूर्णेकर हत्येने ठाण्याचे राजकारण हादरले

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मंगळवारी रात्री मानपाडा-मनोरमा नगर परिसरात प्रदीप पूर्णेकर आपल्या कार्यालयात होते. त्यावेळी काही जण दुचाकीवरून परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. रेकी केल्यानंतर हल्लेखोरांनी कार्यालयाजवळ दुचाकी उभी केली. चेहऱ्यावर रुमाल आणि हेल्मेट घातलेल्या हल्लेखोरांनी कार्यालयात प्रवेश केला आणि पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांच्या हालचालींचा माग काढला जात आहे. गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले. या संपूर्ण प्रकारामुळे मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी मात्र या कारवाईवर समाधान व्यक्त केलेले नाही. या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचा आरोप करीत मृतदेहासह कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर पूर्णेकर यांच्या मुलगा राम आणि भाऊ जयनाथ यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास केवळ हल्लेखोरांपुरता मर्यादित न राहता या हत्येमागील कथित कटापर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण ठाण्याचे लक्ष लागले आहे.

ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मनोरमानगर येथील समाजसेवक प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी करून खरी वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी ठाणे पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर प्रदीप पूर्णेकर हे उबाठाचे काम उत्कृष्टपणे करीत होते. त्याच्या पत्नीनेही मनपा निवडणुकीत चांगली लढत दिली होती. या खुनाचा आम्ही निषेधच करीत आहोत.

गेल्या 15 दिवसात ठाण्यात तीन खून झाले आहेत. एका पीएसआयचाही खून झालेला आहे. एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून महिला मारझोड करीत आहेत. म्हणूनच आपल्या या ठाणे शहराचं नाव वासेपूर करू या का? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केला आहे.

पूर्णेकरांच्या हत्येवेळी आरोपी पप्पू शिंदे होता घटनास्थळीच, रुग्णालयातही सोबत

पूर्णेकर यांच्या हत्येतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्याच्या काही वेळ आधी त्यांच्याच कार्यालयात पप्पू शिंदे बसला होता. पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी केली. तपासादरम्यान त्याचा हत्येच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याच्या वेळी तो घटनास्थळीच होता.

कुटुंबीयांनीही पप्पू शिंदेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला होता. हल्लेखोरांनी गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला केला, मात्र घटनास्थळी असलेल्या पप्पू शिंदेला कोणतीही इजा झाली नसल्याचा मुद्दा कुटुंबीयांनी उपस्थित केला. जखमी पूर्णेकर यांना रुग्णालयात नेण्याच्या हालचालींमध्येही पप्पू शिंदे सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र या सर्व बाबींचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन तपास आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदेंच्या पतीवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा आरोप पूर्णेकर यांचा मुलगा राम आणि भाऊ जयनाथ यांनी केला आहे. हल्ल्यापूर्वी संशयित व्यक्ती आणि राजेंद्र शिंदे यांच्यात भेटीगाठी झाल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. तसेच पूर्वी पूर्णेकर यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांमुळे ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र राजेंद्र शिंदे अथवा मीनाक्षी शिंदे यांच्यावरील हे आरोप पोलिस तपासात अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या कथित राजकीय संबंधांचा तपासात नेमका काय उलगडा होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘कट’ कुणाचा? पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान

पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पप्पू शिंदे याच्यासह काही संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. हत्येमागे राजकीय, सामाजिक की वैयक्तिक वाद होता, यासह आर्थिक हितसंबंधांचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून त्यामध्ये हल्लेखोरांच्या हालचाली कैद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फरार आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी हे फुटेज महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

क्लस्टर, अनधिकृत बांधकाम आणि अमली पदार्थांविरोधातील भूमिका

पूर्णेकर यांनी परिसरातील क्लस्टर योजनेबाबत भूमिका घेतली होती. अनधिकृत बांधकामे आणि अमली पदार्थांच्या विरोधातही त्यांनी आवाज उठविल्याचे कुटुंबीय व समर्थकांचे म्हणणे आहे. स्थानिक राजकीय वर्चस्वाच्या संघर्षातूनही त्यांचे काही राजकीय व्यक्तींशी मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्णेकर यांची हत्या झाली का, की त्यामागे अन्य वैयक्तिक अथवा आर्थिक कारण होते, हा तपासाचा मुख्य मुद्दा आहे. पोलिसांसमोर आता केवळ गोळीबार करणाऱ्यांना पकडण्याचे नव्हे, तर हत्येचा हेतू आणि सूत्रधार शोधण्याचे मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT