Pradeep Purnekar case Pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Case: टल्ली-पपलू यांना सोमवारी न्यायालयात हजर करणार

मुख्य सूत्रधार संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि जयकिशन सिंग उर्फ पपलू यांना ठाणे गुन्हे शाखेच्या एसआयटीने घेतले ताब्यात; न्यायालयात हजर करणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: उबाठा पक्षाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार संतोष कनोजिया उर्फ टल्ली (४१) आणि हेल्मेट परिधान केलेला आरोपी जयकिशन सिंग उर्फ पपलू (३४) या दोघांना घेऊन ठाणे गुन्हे शाखेचे पथक रविवारी संध्याकाळ पर्यंत ठाण्यात येणार आहेत.

त्यानंतर या दोघांना सोमवारी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

ठाण्यातील उबठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात पप्या शिंदे, निखिल यादव व नितेश पवार या तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि एक अज्ञात मारेकरी गेले आठवडाभर फरार होते.

दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेच्या एसआयटी पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू या दोघांना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ताब्यात घेतले.

दोघांनाही रविवारी ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. पूर्णेकर हत्या प्रकरणात एसआयटी पथकाने तीन दुचाकी, एक पिस्तूल, मोबाइल आणि एक कार जप्त केली आहे.

मात्र, गोळीबारात प्रत्यक्ष सहभाग असलेला संतोष ऊर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी अमित दोघेही पोलिसांना गेले आठवडाभर चकवा देत होते. गेल्या एक आठवडाभरापासून एसआयटीतील युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक शरद पाटील आणि खंडणी विरोधी पथकातील भूषण कापडणीस यांचे पथक त्यांच्या मागावर होते.

त्यांच्या ठावठिकाण्याची पक्की खबर मिळाल्यानंतर या दोघांनाही प्रयागराज येथील एका मंदिरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या दोन्ही आरोपीना उत्तर प्रदेशातील स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांचा ट्रान्झिस्ट रिमांड घेण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस पथक रेल्वेने ठाण्यात दाखल होणार आहेत.

तर सोमवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार असून या दोघांच्या चौकशीतून या हत्येच्या कटाचा नेमका उद्देश काय होता याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे दोघा आरोपींच्या चौकशीतून काय सत्य समोर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT