ठाणे : ठाण्यातील एका बिल्डरकडून 25 लाख लाचेची रक्कम घेताना अटक करण्यात आलेले ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर या दोघांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस पथकाने ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडी दोन दिवसाची वाढ केली आहे. लाच प्रकरणातील पाटोळे, गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांनाही सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ठामपा उपायुक्त पाटोळे आणि गायकर या दोघांना बुधवारी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. सरकारी वकील संजय लोंढे यांनी यावेळी काम पाहिले.