ठाणे : ठाणे महानगर पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या लाचप्रकरणी ठाणे लाचलुचपत खात्याच्या पथकाने अटक केलेले आरोपी संदीप पावसकर आणि मंदार गावडे यांना बुधवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.शिंदे यांनी दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
25 लाखाच्या लाच प्रकरणी पालिका उपायुक्त पाटोळे प्रकरणात लाचलुचपत खात्याने शनिवारी 25 आक्टोबर, 2025 रोजी संदीप पावसकर आणि मंदार गावडे याना अटक केली. त्यानंतर ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर पुन्हा सोमवारी 27 आक्टोबर, रोजी ठाणे न्यायालयात नेले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी दिले.
त्यानुसार बुधवारी संदीप पावसकर आणि मंदार गावडे याना ठाणे न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायमूर्तींनी दोघां आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
आणखी आरोपीच्या अटकेची शक्यता
ठाणे पोलीस उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह आतापर्यंत ठाणे लाचलुचपत खात्याच्या पथकाने लाच प्रकरणी अटक केलेली आहे. त्यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर तपासात संदीप पावसकर आणि मंदार गावडे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने दोघांना अटक केलेली आहे. लाचलुचपत खात्याच्या पोलीस पथकाच्या तपासात लाच प्रकरणात आणखीन नव्या नावाचा उलगडा होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.