Palghar Worker Torture Pudhari
ठाणे

Palghar Worker Torture: झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळण्याचा प्रकार; वीटभट्टी मालकाचा मजुरावर अमानुष अत्याचार; दोन आरोपींना अटक

पालघरमध्ये वीटभट्टी मालकासह दोघांना अटक; श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याने 48 तासांत सुटका

पुढारी वृत्तसेवा

केळवा रोड : कामाच्या उचल पैशांच्या वादातून वीटभट्टीवर काम करणाऱ्या 25 वर्षीय कातकरी आदिवासी मजुराचे अपहरण करून त्याला झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळण्याचा मानवतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालघर परिसरात संतापाची लाट उसळली असून केळवा सागरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादी सुभाष शिनवार भोईर (25) राहणार सफाळे नावझे याचा मोठा भाऊ मदन हा भिवंडी तालुक्यातील पाये येथील वीटभट्टी मालक नंद देवलीकर याच्याकडे कामाला होता. घरखर्चासाठी मदनने मालकाकडून सुमारे 50 हजार रुपयांची उचल घेतली होती. मात्र काही दिवसांपासून तो कामावर हजर राहत नसल्याने संतप्त झालेल्या मालकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान मदनचा ठावठिकाणा लागत नसल्याने नंद देवलीकर हा त्याचा साथीदार घनश्याम याच्यासह पालघर तालुक्यातील जलसार येथे पोहोचला. तेथे मदन न सापडल्याने आरोपींनी त्याचा लहान भाऊ सुभाष भोईर याला जबरदस्तीने गाडीत बसवून 11 मार्च रोजी अपहरण केले. त्यानंतर त्याला भिवंडीतील पाये येथील वीटभट्टीवर नेण्यात आले.

वीटभट्टीवर नेल्यानंतर आरोपींनी मदनचा पत्ता विचारत सुभाषवर अमानुष अत्याचार सुरू केले. धारदार इस्त्राने त्याच्या मानेवर आणि कमरेवर घासून त्याला जखमी करण्यात आले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी सुभाषचे हात-पाय दोरीने बांधून त्याला वीटभट्टी परिसरातील आंब्याच्या झाडाला पाय वर आणि डोके खाली अशा अवस्थेत उलटे टांगले. त्यानंतर त्याच्या उघड्या जखमांवर तिखट मसाला चोळल्याने तो वेदनेने तडफडत मदतीसाठी ओरडत होता. यानंतर आरोपींनी त्याला रात्रभर वीटभट्टीवरील सिमेंटच्या खोलीत डांबून ठेवले. या घटनेनंतर पीडित मजूर आणि त्याच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी श्रमजीवी संघटनेची मदत घेतली. संघटनेच्या पालघर तालुका महिला अध्यक्षा रेखा धांगडे यांच्याकडे त्यांनी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तातडीने पीडित कुटुंबाला धीर देत पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

यानंतर संघटनेचे तालुका अध्यक्ष उल्हास पाटील, तालुका सचिव हिना वनगा, उपाध्यक्ष प्रमिला पवार, कामगार जिल्हा सचिव बबल त्रिवेदी, कार्यालयीन सचिव शंकर वरखडे, ॲडव्होकेट राऊत यांच्यासह कार्यकर्ते नयन धांगडे, कविता तुम्बडा, रोशन धांगडे, रुचिता सुतार आदींनी केळवा सागरी पोलीस ठाणे गाठत पाठपुरावा केला.

बुधवारी रात्री सुमारे 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या मदतीने 48 तासांच्या आत सुभाषची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालक नंद देवलीकर आणि त्याचा साथीदार घनश्याम राहणार पाये, भिवंडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींना केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी अटक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT